कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी देहूत लाक्षणिक उपोषण..

जगद्गुरू संत तुकाराम महाराज कर्जमाफी योजनेचा प्रस्ताव सादर करणार
आमदार रोहित पवार व वारकरी आघाडीचे दत्ता महाराज दोन्हे पाटील उपोषणास बसणार
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होईपर्यंत शांत बसणार नाही – रविकांत वरपे
प्रतिनिधी देहू पुणे दि. १९ ऑक्टोबर २०२५ राज्यातील महायुती सरकारला सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वारकरी आघाडीच्या वतीने सोमवार, २० ऑक्टोबर रोजी देहू येथे
लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार, वारकरी आघाडीचे राज्य प्रमुख ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे पाटील हे लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत. तसेच, जगद्गुरू संत तुकाराम महाराज कर्जमाफी योजनेचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, ही पक्षाची आग्रही मागणी असून, त्यासाठी आम्ही सर्व पातळ्यांवर लढत राहू, असा इशारा पक्षाचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी दिला.
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट उभे राहिले आहे. राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी, नेहमी प्रमाणे घोषणांच्या गजबजाटात जबाबदारी झटकण्यातच मश्गुल झाले आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील ६८ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. उभे पीक वाहून गेले असताना आणि रब्बी हंगामाचीही तयारीही करता येणार नाही, अशी परिस्थिती असताना सरकारकडून पंचनाम्यांचे कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत.
राज्यातील सुमारे ६० हजार हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. या संकटात शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला असून, हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि सरसकट कर्जमाफी दिली तरच हा जगाचा अन्नदाता(पोशिंदा) नव्या उमेदीने उभा राहू शकणार आहे. संवेदना हरवून बसलेल्या महायुती सरकारचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषणचे आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षाचे सरचिटणीस तथा फ्रंटल सेलचे प्रभारी आमदार रोहित पवार हे पक्षाचे वारकरी आघाडीचे राज्य प्रमुख ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे पाटील उपोषणास बसणार आहेत. तसेच, या वेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज कर्जमाफी योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती रविकांत वरपे यांनी दिली.
आमदार रोहित पवार हे सोमवारी सकाळी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे दर्शन घेतील आणि भक्ती-शक्ती शिल्पास पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन लाक्षणिक उपोषणाला सुरुवात होईल. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष तुषार कामठे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष (शिरूर, मावळ) देवदत्त निकम, जिल्हाध्यक्ष (बारामती) विजय कोलते, मावळ तालुकाध्यक्ष दत्ता पडवळ उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन वाजता संत तुकाराम महाराजांची विश्वप्रार्थना आणि संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने या आंदोलनाची सांगता होईल, असे वरपे यांनी सांगितले.
कोट
महाराष्ट्रात १६२८ ते १६३० या काळातील दुष्काळात माणसं उपाशी मरू लागली होती. आपलाच समाज उपाशी असताना, आपण पंचपक्वान्ने कशी खावीत, या भावनेतून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी त्यांच्याकडील कर्जखात्याच्या नोंदी बुडवल्या होत्या. हाच आदर्श नजरेसमोर ठेवून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनीही केंद्रीय कृषिमंत्री असताना ७२ हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी मिळवून दिली होती. महायुती सरकारला या कर्तव्याची जाणीव व्हावी आणि राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आम्ही श्री. विठ्ठल आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी साकडे घालणार आहोत.- ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे पाटील, राज्य प्रमुख, वारकरी आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार.
कोट
राज्यातील शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला असताना, शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि सरसकट कर्जमाफी हा पर्याय आहे. मात्र, सरकारकडून निकषांचे अडथळे उभे करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि आमदार रोहितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर सरकारला जागे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी सरकारविरोधातील आंदोलनांची धार कमी होऊ देणार नाही.- रविकांत वरपे, प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष
‘शेतकऱ्यांची फसवणूक करू नका’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे २०१७मध्ये दीड लाख रुपयांपर्यंतची पीक कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने सुमारे सहा लाख ५६ हजार पात्र शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सहा आठवड्यांमध्ये कर्जमाफीचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. सरकार २०१७च्या घोषणांची २०२५पर्यंत अंमलबजावणी करत नसेल, तर १५ दिवसांपूर्वी केलेल्या घोषणांचे काय? राज्य सरकारने केवळ घोषणांचा गोंधळ आणि आकड्यांची गणितं
मांडत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे निर्णय घ्यावेत आणि नुसत्या घोषणांतून शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. असे प्रदेश प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रविकांत वरपे म्हणाले.




