
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २७ ऑगस्ट २०२६ अवजड वाहतूक आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका; तात्पुरत्या डागडुजीऐवजी कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी
कल्याण-पडघा मार्गाच्या दुरवस्थेविरोधात आणि कायमस्वरूपी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आमणे परिसरात स्थानिक ग्रामस्थांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
भिवंडी व कल्याण तालुक्यातील सुमारे २० ते २५ गावांना जोडणाऱ्या कल्याण-पडघा मार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. मार्गाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी अखेर आमणे परिसरात उपोषण आंदोलन केले. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
कल्याण-पडघा मार्ग हा भिवंडी तालुक्यातील अनेक गावांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गालगत मोठ्या प्रमाणात गोदामे व कारखाने उभारण्यात आल्याने अवजड वाहनांची वाहतूकही वाढली आहे. त्यातच पावसामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होऊन ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
खड्ड्यांमुळे या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने नोकरदार, विद्यार्थी व ग्रामस्थांना त्याचा फटका बसत आहे. रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या समस्येबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा निवेदने आणि पत्रव्यवहार केला. मात्र, त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी उपोषणाचा निर्णय घेतला. काॅ. रमेश गायकवाड आणि जयवंत दळवी हे उपोषणकर्ते असून आंदोलनात विविध गावांतील तरुण आणि ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. मार्गावरील खड्डे डांबराच्या साह्याने भरून रस्ता सुस्थितीत करावा, अपघातग्रस्तांना भरपाई द्यावी, रस्त्यावर मागील तीन वर्षांत झालेल्या खर्चाची चौकशी व्हावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. कल्याण-पडघा मार्गाची दुरावस्था झाली आहे. त्याचा फटका आम्हा गावकऱ्यांना बसत आहे. दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन वाहने चालवित आहेत. प्रशासनाने तात्काळ रस्त्याची कायमस्वरुपी दुरुस्ती करावी असे डॉ श्याम पाटील यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींना सांगीतले.



