३२० करोड रूपये खर्च करून बांधलेले काँक्रिट रस्ते तोडण्याचे काम पुन्हा सुरू ! जनतेच्या टॅक्स रूपी पैशाची उधळण !

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २६ ऑक्टोबर २०२६ टेंडर काढा रस्ते बनवा आणि पुन्हा तोडा जबाबदार कोण? ११० करोड रू. ते ३२० करोड रू. अंदाजे टेंडर होते.
‘नियोजन शुन्य कारभार अशी शासकीय यंत्रणा जनतेच्या टॅक्सच्या पैसातून उधळपट्टी’.
डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये नवीन बनविलेले काँक्रिट रस्ते तोडण्याचे काम आता पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू झाले आहे. मिलापनगर मधील रस्ता क्रमांक दोन वरील बंगलो भुखंड क्रमांक आरएल १२७ समोर एका मोठ्या नाल्याच्या बांधकामासाठी काँक्रीटचा आडवा रस्ता तोडला गेला असून तेथील वाहतूक तर बंद केलीच पण पादचाऱ्यांना देखील तेथून जाता येत नसल्याने मोठा वळसा घालून जावे लागत आहे. अंदाजे महिनाभर त्रास हा वाहन धारक आणि पादचाऱ्यांना होणार आहे. शिवाय हा रस्ता तोडताना आवाज आणि धूलिकण याचे प्रदूषण होत आहे. जवळच बंगल्यात राहणारे एक वयोवृध्द जोडपे ( वय ९० ते ९४ वर्षे) याना व इतरांना या प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
एमआयडीसी मधील असे अनेक रस्ते हे नवीन नाले/गटारे, सांडपाणी/विद्युत/पाणी वाहिन्या अशा विविध कारणासाठी यापूर्वी तोडण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांत असे अंदाजे २१ रस्ते तोडण्यात आल्यामुळे शासनाच्या अर्थात जनतेच्या पैशाचा चुराडा झाला असून या नियोजनशून्य कामामुळे याला प्रशासन जबाबदार आहे. हे विविध सर्व रस्ते एमएमआरडीए, एमआयडीसी, केडीएमसी यांनी बनविले होते. हे रस्ते बनविताना दुसऱ्या शासकीय यंत्रणेबरोबर समन्वय न साधल्याने असे रस्ते तोडायला लागत असून भविष्यात अजून असेच अनेक रस्ते तोडायला लागणार आहेत. त्यामुळे या नवीन काँक्रिट रस्त्यांच्या दर्जा भविष्यात खराब होणार आहे. त्यामुळे पुन्हा काही वर्षांनी हे रस्ते नवीन बनवायला लागणार आहेत. नियोजन शुन्य शासकीय यंत्रणा आणि टक्केवारी भ्रष्टाचारी कारभार आता याला जबाबदार कोण? असा प्रश्न टॅक्स भरणारे नागरिक करीत आहेत.



