केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ राज्यातील शेतकरी काळी दिवाळी साजरी करणार..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २४ ऑक्टोबर २०२६ राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अनेक दिवस उलटले तरीही राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना फक्त मदतीची आश्वासने दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, सरकारच्या या उदासीन भूमिकेच्या निषेधार्थ राज्यातील शेतकरी यंदाची दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी करणार आहेत अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे, पीक नुकसानीची भरपाई करणे आणि त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना करणे ही केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी आहे.
मात्र, दुष्काळ जाहीर करूनही शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे.
सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात असून, प्रत्यक्ष मदतीबाबत ठोस निर्णय आणि अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप सतीश काळे यांनी केला.
दिवाळी हा सण आनंदाचा, प्रकाशाचा आणि समृद्धीचा असला तरी आज राज्यातील अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक संकट असताना सरकारच्या केवळ आश्वासनांवर समाधान मानून सण साजरा करणे शक्य नाही. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ शेतकरी बांधवांनी आपल्या घरावर काळा झेंडा फडकवून काळी दिवाळी साजरी करावी असे आवाहन काळे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी पीक नुकसानीची योग्य भरपाई मिळावी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणीही त्यांनी केली. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या घरावर काळा झेंडा फडकवून केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध नोंदवावा असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले आहे.



