मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतीश काळे नजरकैदेत..

नजरकैदेत ठेवण्याच्या प्रकाराचा संभाजी ब्रिगेडकडून तीव्र निषेध
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०४ नोव्हेंबर २०२६ हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक ३ चे उद्घाटन तसेच पुणे मेट्रो टप्पा-२ च्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांना मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत तब्बल १२ तास नजरकैदेत ठेवण्यात आले.
या घटनेचा सतीश काळे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोगामी विचारांच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवणे, हा लोकशाही मूल्यांचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान असल्याची भावना त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली.
सत्ताधाऱ्यांच्या दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवून नेमका कोणता संदेश दिला जात आहे? लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची अशा प्रकारे गळचेपी करणे योग्य नाही प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा आदर केला पाहिजे असेही काळे यांनी म्हटले आहे.
यापूर्वीही अनेक वेळा सतीश काळे यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून पोलीस लॉकअपमध्येही ठेवण्यात आले होते. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लोकशाही मार्गाने जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहील. नजरकैद, पोलीस कारवाई किंवा दबावाच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबता येणार नाही असा ठाम इशाराही संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिला आहे.



