पिंपरी-चिंचवडपूणेमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

वंचित बहुजन आघाडीचा पुणे जिल्हा, पुणे महानगर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये संघटनात्मक फेरबांधणीचा मोठा निर्णय;

सर्व प्रमुख कार्यकारण्या बरखास्त.
“नव्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी देणार – राजेंद्र पातोडे”

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २८ नोहेंबर २०२६ वंचित बहुजन आघाडीचा पुणे जिल्हा, पुणे महानगर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये संघटनात्मक फेरबांधणीचा मोठा निर्णय घेण्यात आला असून सर्व प्रमुख कार्यकारण्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.नव्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी देऊन नव्याने लवकरच इच्छुकांच्या मुलाखती घेऊन नवीन कार्यकारण्या जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीने पुणे जिल्हा, पुणे महानगर आणि पिंपरी-चिंचवड महानगरातील पक्ष संघटनेत मोठे संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक व्यापक, सक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने या तिन्ही क्षेत्रांतील विविध आघाड्या, विधानसभा मतदारसंघ तसेच कामगार संघटनांच्या विद्यमान कार्यकारण्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, केंद्रीय सदस्य तथा महिला आघाडीच्या राज्य महासचिव डॉ. अरुंधती सिरसाठ आणि प्रदेश महासचिव प्रा. सोमनाथ साळुंके यांनी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे.या निर्णयानुसार पुणे विभाग, पुणे जिल्हा, पुणे महानगर, युवा आघाडी, पुणे जिल्हा महिला आघाडी, सर्व विधानसभा मतदारसंघांच्या कार्यकारण्या तसेच पुणे जिल्हा व पुणे महानगर माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड महानगर, महानगर युवा आघाडी, महानगर महिला आघाडी, सर्व विधानसभा मतदारसंघांच्या कार्यकारण्या तसेच पिंपरी-चिंचवड महानगर माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या सर्व कार्यकारण्याही बरखास्त करण्यात आल्या आहेत.
पुणे महानगर महिला आघाडीची विद्यमान कार्यकारणी कायम ठेवण्यात आली आहे.
पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी करताना केवळ पदांची फेररचना न करता संघटनेत नव्या नेतृत्वाला संधी देण्यावर भर दिला जाणार आहे. पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक असलेल्या, संघटनात्मक कामाची क्षमता असलेल्या आणि जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करण्याची तयारी असलेल्या जुन्या तसेच नव्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याची संधी दिली जाणार आहे.यासाठी लवकरच पुणे जिल्हा, पुणे महानगर आणि पिंपरी चिंचवड महानगरातील इच्छुक व पात्र कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात येणार असून, त्यानंतर सर्व स्तरांवरील नवीन कार्यकारण्या अधिकृतपणे जाहीर केल्या जाणार आहेत.या संघटनात्मक निर्णयातून वंचित बहुजन आघाडीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पक्ष संघटनेला नव्याने उभारी देण्याचे संकेत दिले आहेत. नव्या नेतृत्वाला संधी, कार्यकर्त्यांचा व्यापक सहभाग आणि तळागाळातील संघटनात्मक बांधणी यावर आगामी काळात भर दिला जाणार असल्याचे या निर्णयातून स्पष्ट होत आहे.संघटन अधिक बळकट करणे, संघर्ष अधिक तीव्र करणे आणि वंचितांच्या आवाजाला अधिक ताकद देणे, हा या नव्या संघटनात्मक बांधणीमागील प्रमुख उद्देश असल्याचे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button