सांगवीतील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या जागेवर संविधान सृष्टी व विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी उभारा – शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड/सांगवी दि. ३१ ऑक्टोबर २०२६ सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविल्याप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून आता या परिसराचा व्यापक विकास करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. काँग्रेस आणि समविचारी पक्ष संघटनेच्या आंदोलनाचा आज (दि.३०) नववा दिवस होता. सांगवीतील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या जागेवर संविधान सृष्टी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वसतिगृह उभारून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी’ विकसित करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
बनसोडे यावेळी म्हणाले की, संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प बेकायदेशीरपणे हटवून जेसीबीच्या साहाय्याने स्मारक उद्ध्वस्त केल्याप्रकरणी संबंधित नगरसेविका तृप्ती संतोष कांबळे, संतोष कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच हटविण्यात आलेली प्रास्ताविका पुन्हा त्याच ठिकाणी स्थापित केली जावी. आंदोलनादरम्यान नागरिक आणि विविध संघटनांशी झालेल्या चर्चेतून या परिसरात व्यापक स्वरूपाचे स्मारक उभारण्याची मागणी पुढे आली आहे. संविधानाची निर्मिती, संविधानाची मूल्ये, प्रास्ताविका आणि मानवी हक्क यांची माहिती देणारी संविधान सृष्टी या ठिकाणी उभारण्यात यावी.
सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी आणि पिंपळे निलख परिसरातील नागरिकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी अभ्यासिका उभारण्याची गरज असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या परिसरात मोठी असल्याने अभ्यासिका आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारल्यास त्याचा मोठा फायदा होईल. सांगवीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) मोडकळीस आलेल्या क्वार्टर्सची जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून घ्यावी. त्यातील सुमारे एक एकर जागेवर हे अध्ययन केंद्र विकसित करावे.
या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय, कलासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरसचिव विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेच्या पुनर्स्थापनेपुरते आंदोलन मर्यादित न ठेवता, या घटनेच्या माध्यमातून शहरात संविधान जागृती, विद्यार्थी हित आणि सामाजिक प्रबोधनाचे केंद्र निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मत नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केले.



