भाजप महायुतीची लोकशाहीबचाव यात्रा म्हणजे सगळ्यात मोठा जागतिक विनोद? – प्रा. बी. बी. शिंदे

सत्तेत बसून आंबे खायचे कोय विरोधकाच्या दारात टाकून कांगावा (आरडा ओरडा) करणे म्हणजेच भाजपाची लोकशाही बचाव यात्रा होय- हरीचंद्र (आप्पा) शिंदे
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ नोहेंबर २०२६ काल भाजपा व सहयोगी पक्षांची जी लोकशाहीबचाव यात्रा झाली त्या संदर्भात सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रा. बी. बी. शिंदे यांनी समिक्षा केली त्यात ते म्हणतात की ज्यांच्या हातात सत्तेची सूत्रे आहेत, ज्यांच्या राजवटीत लोकशाही संस्था आणि घटनात्मक मूल्यांवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तेच लोक आता लोकशाही वाचवण्यासाठी यात्रा काढत असतील, तर यापेक्षा मोठा राजकीय विनोद कोणता? भाजप महायुतीची ‘लोकशाही बचाव यात्रा’ म्हणजे लोकशाहीच्या नावाने निघालेली राजकीय विसंगतीच म्हणावी लागेल.
संविधानिक संस्थांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, तपास यंत्रणांच्या निष्पक्षतेवर विरोधकांनी आक्षेप घेतले, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर देश विरोधी कारवायांचे सत्र सुरू असल्याचे आरोप झाले. नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्यासारखे आर्थिक गैरव्यवहारांचे आरोपी भाजपने सुरक्षित देशाबाहेर पाठवले. शेतकरी आंदोलन असो, विद्यार्थी आंदोलने असोत किंवा नागरिकांचे मोर्चे; आंदोलनकर्त्यांवरील पोलिसी बळाच्या वापरावर वारंवार प्रश्न उपस्थित झाले. मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तरुणांच्या हाताला काम मिळाले का? बेरोजगारीचा प्रश्न सुटला का? सरकारी मालमत्ता, रेल्वे, बंदरे आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या खासगीकरणावर प्रश्न विचारले जात असताना सरकारची भूमिका काय आहे? देशातील संपत्ती अदानी आणि अंबानी या मित्रांना कुणी वाटून दिली? मोजक्या उद्योगसमूहांच्या हातात देशाची संपत्ती एकवटत असल्याची टीका होत असताना लोकशाही बचावाचा नारा कोणत्या तोंडाने दिला जात आहे?
मणिपूर जळत असताना तिकडे न जाता परदेशवारी कोण करत होते? बिनबुलाये पाकिस्तानात जाऊन कोण बिर्याणी खात होते. चीनने भारताच्या सीमेच्या आतपर्यंत टेन्ट उभारले तेंव्हा लाल डोळे दाखवायची संधी असताना कोण मूग गिळून गप्प बसले होते? देशातील गंभीर प्रश्नांपेक्षा प्रतिमानिर्मितीला अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका विरोधकांनी केली. हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी कुणी केली?
निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले. मतचोरीचे आरोप झाले. या आरोपांची निष्पक्ष चौकशी आणि निवडणूक व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवणे ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. मात्र, वोट चोरी करून कुणी घपला केला?
धर्म आणि जातीच्या नावावर समाजा समाजात ध्रुवीकरणाचे राजकारण करून फोडा आणि राज्य करा ही इंग्रज नीती वापरुन सामाजिक सलोखा बिघडवणारे लोकशाही बचाव म्हणून विरोधकांना संविधानचोर म्हणत आहेत, यासारखे बालिश विधान कोणतेच नसेल. चोराच्या उलट्या बोंबा अशी अवस्था भाजप महायुतीची झाली आहे. संविधानाला कवडीचीही किंमत न देता आमदार खासदार फोडून कुणी अराजकाची परिस्थिती निर्माण केली हे देशालाच नव्हे, जगाला माहिती आहे.
भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर ५२ वर्षे देशाचा तिरंगा ज्यांनी फडकवला नाही, ते आम्हाला देशभक्ती शिकवणार? वा रे तुमची देशभक्ती? ज्या संघटनेच्या वैचारिक भूमिकेतून भाजपची राजकीय वाटचाल घडली, तिच्या राष्ट्रवादाच्या व्याख्येवरही चर्चा होणे आवश्यक आहे.
लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नव्हेत. लोकशाही म्हणजे विरोधकांना बोलण्याचे स्वातंत्र्य, माध्यमांना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य, न्यायसंस्थेची स्वायत्तता, नागरिकांचे अधिकार आणि संविधानाचा सन्मान! लोकशाही ही कोणाच्या पक्षाची खासगी मालमत्ता नाही. ती देशातील सव्वाशे कोटींहून अधिक नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे.
म्हणूनच लोकशाहीला धोका नेमका कोणापासून आहे? आणि ती वाचवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच लोक आज रस्त्यावर उतरून लोकशाही बचावाचा नारा का देत आहेत? संविधानिक संस्था मोडकळीस आणून मर्दुमकी गाजवणाऱ्या भाजपने आधी आत्मपरीक्षण करावे. देशात महिला, मुली, शेतकरी, विद्यार्थी, सरकारी कर्मचारी कुणीच सुरक्षित नसताना देश वाचवण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी विरोधी पक्ष, विद्यार्थी (gen z), शेतकरी, महिला आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत, त्याचे कारण ज्यांच्या हातात हा देश चालवण्यासाठी दिला होता, ते निकम्मे निघाले. म्हणूनच लोकशाहीबचाव यात्रा करून ढोंग करण्यापेक्षा निवडणूक आयोगाला, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमनेटचा गैरवापर करून विरोधकांची कोंडी करणाऱ्या भाजपाने आधी आरसा बघावा. हा देश गांधी, नेहरू, आंबेडकर आणि लोकशाही संविधानानुसारच चालेल. तुमच्या मनुवादी विचाराने नाही हे सांगण्यासाठी देश तुमच्या विरोधात उभा आहे हे विसरू नका. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी आधी आपल्या कारभाराचा हिशेब द्यावा. लोकशाहीच्या रक्षणाची सुरुवात सत्तेच्या आत्मपरीक्षणापासून होते, किरकोळ यात्रांच्या घोषणांपासून नाही! रामलीला मैदानातील गर्दी तुमच्या लाखपटीने जास्त आहे. त्यामुळे देश वाचविण्याची जबाबदारी आता देशातील करोडो जनतेने स्वतःची जबाबदारी म्हणून स्वतःच्या हातात घेतली आहे. जनता आता स्वतः हा देश सुरक्षित करेल. देश बचाव लोकशाही बचाव!
” देश रसातळाला पोहंचवला तरी कीती खोटे बोलाल, चोरांच्या उलट्या बोंबा हे देश सर्व जाणतो जयभीम, जय संविधान, जय भारत.
यावेळी हरीचंद्र (आप्पा) शिंदे अध्यक्ष सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य आणि कार्याध्यक्ष जेष्ठ पत्रकार व विचारवंत, लक्ष्मणराव रोकडे” उपस्थित होते.



