अनधिकृतअवैधआर्थिकमहाराष्ट्रविशेषसामाजिक

पवना धरण परिसरातून लाल माती उपशाचा धुमाकूळ; मास्टरमाइंडचा शोध घेऊन कारवाईची युवराज दाखले यांची मागणी…

प्रतिनिधी मावळ दि. ०२ जून २०२६ पवना धरण पाणलोट क्षेत्रातून मागील काही महिन्यांपासून गाळ काढण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लाल मातीची अवैध वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवशाही व्यापारी संघटनेचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
युवराज दाखले यांनी यापूर्वीही याच प्रकाराबाबत जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला होता. त्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार कार्यालयाने काही वाहनांवर कारवाई केली होती. मात्र काही काळ शांतता राहिल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर लाल माती उपसा आणि वाहतूक सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या पावसाळा जवळ आल्याने माती वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, दिवस-रात्र शेकडो हायवा आणि डंपर रस्त्यावर धावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातील अनेक वाहनांवर नंबर प्लेट नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
वाघेश्वर मंदिर परिसरातून घेवंडे, खडक, चांदेवाडी, ठाकूरसाई, ब्राह्मणोली, पवनानगर, कडधे, शिवणे, बेबड ओहोळ मार्गे ही वाहने चांदखेड परिसराकडे जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. या अवैध माती उपशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची तसेच रस्त्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत बोलताना युवराज दाखले म्हणाले, “गाळ काढण्याच्या नावाखाली लाल मातीची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. या संपूर्ण रॅकेटमागील सूत्रधार कोण आहेत, याचा सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच अवैध माती वाहतूक तात्काळ बंद करण्यासाठी महसूल, पोलीस आणि संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम राबवावी.”
स्थानिक नागरिकांमधूनही या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!