भावपूर्ण श्रद्धांजली : दिवेआगार दुर्घटना..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०३ ऑक्टोबर २०२६ रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य दिवेआगार समुद्रकिनारा… जिथे लाटांचा निनाद मनाला शांत करतो, तिथेच ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी काळाने घाला घातला. आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या विनर्स अकॅडमीच्या आठ निरागस विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अकरावी-बारावीमध्ये शिकणारी ही मुले स्वप्नांच्या दुनियेत शुकतीच सुरुवात केली होती, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते.

यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वाहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य सतीश वासनकर, राजवीर युवराज वहिले, प्रणव रामदास बनसोडे, सुमीत भरत अहिरे… ही नावे आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणत आहेत.
सहलीचा आनंद क्षणात शोकात बदलला. एकाला वाचवायला गेलेला दुसरा, दुसऱ्याला वाचवायला गेलेला तिसरा… या धडपडीत आठही कळ्या काळाच्या ओघात वाहून गेल्या. स्थानिकांनी, जीवरक्षकांनी जीवाच्या आकांताने प्रयत्न केले, सीपीआर दिला, पण दैवापुढे सर्व प्रयत्न अपुरे ठरले.
या कोवळ्या जीवांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडिलांचा आधार हरपला, वर्गातील बाक रिकामे झाले, मित्रांच्या आठवणी उरल्या. हे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.
या दुःखद प्रसंगी आपण सर्वांनी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊया. त्या आठही आत्म्यांना चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
टिप: पाणी, दरी डोंगर आपल्याला माहित नसलेल्या तसेच अनुभव नसलेल्या अंजानस्थळी कृपया सहल किंवा पाण्यात उतरू नये. जो पर्यंत कोणी निष्णात, अनुभवी व्यक्ती बरोबर नसताना कोणतेही धाडस करू नये! याची दक्षता घ्यावी.



