
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर चोरांचा मात्र वाढला सुळसुळाट…
प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि. १४ सप्टेंबर२०२५ वेळोवेळी पाठपुरावा करून देखिल नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांचा मात्र या प्रकरणाकडे कानाडोळा होताना दिसतो आहे.
नवी मुंबई नेरूळ पश्चिम मधील सेक्टर १८/१८A, सेक्टर १६/१६A, या प्रभागातील सीसीटीव्ही यंत्रणा तब्बल २ ते ३ महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहे, मिळालेल्या माहितीनुसार चौकातील काँक्रीटीकरणानंतर या विभागातील सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त झाली आहे. विभागातील समाजसेवक तसेच नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र त्यांच्या हाती निराशाच आली आहे. याच विभागात मागील आठवड्यापासून तब्बल ४ दुकाने शटर वाकवून फोडण्यात आली आहेत. मात्र सीसीटीव्ही यंत्रणा कार्य करत नसल्याने पोलिसांना सुद्धा चोरांचा शोध घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास सेक्टर १६ ए मध्ये असलेल्या २ दुकानात शटर वाकवून चोरी करण्यात आली. या दुकानाच्या समोर पालिकेने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा आहेत मात्र ते तब्बल २ ते ३ महिन्यापासूनच नादुरुस्त आहेत. चोऱ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता आता तरी पालिका अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करावी जेणेकरून पोलिसांना सुद्धा त्याचा योग्य उपयोग करता येईल असे नागरिकांचे मत आहे.



