
पत्रकारीतेचे पेपर, परिक्षा जुन्या पॅटर्ननुसार, गुण मात्र दिले नव्या पॅटर्ननुसार..
प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. २५ फेब्रुवारी २०२५ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ऑक्टोबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकारीता पदव्युत्तर प्रथम वर्षाचा (एमए एमसीजे) निकाल नुकताच जाहीर झाला. या प्रथम वर्षाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) अभ्यासक्रम लागु करण्यात आला असलातरी प्रत्यक्षात परिक्षेची गुणपध्दत तसेच पेपरही जुन्याच (२०१९पॅटर्ननुसार) पध्दतीने विद्यार्थ्यांनी दिले. मात्र विद्यार्थ्यांना गुण देतांना विद्यापीठाने नव्या रचनेनुसार (एनईपी,नवीन अभ्यासक्रम २०२०) ७०-३० ही पध्दत (फॉर्म्युला) अवलंबिली. याचा निकालावर परिणाम झाला असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता, टक्केवारी घसरली आहे. विद्यापीठाच्या या गलथान कारभाराबद्दल विद्यार्थ्यांमध्ये चिड निर्माण झाली आहे.
पुणे विद्यापीठाच्या गलथान कारभाराबद्दल कुणी बोलायलाच नको, रोज नवनवीन विषय, प्रकरणे समोर येत असतांना सुस्त यंत्रणेला मात्र त्यांचे काही देणेघेणे नाही. प्रमुख अधिकाऱ्यांसह सारेच जण आपल्यावरील जबाबदारी दुसऱ्यांवर झटकण्यात धन्यता मानतात. नव्या शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) (ट्रायल बेसेसवर) पत्रकारीतेच्या पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या अमंलबजावणीला गेल्या वर्षी (२०२२-२३) फक्त विद्यापीठाच्या जर्नालिझम विभागात सुरवात झाली. अभ्यासक्रम, विषयाची संख्या, अध्ययन पध्दती, प्रात्याक्षिक, अंतर्गत परिक्षा या घटकांमध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणी या सर्व बाबींचा विचार करण्यात आला. त्यावेळी विद्यापीठातील पत्रकारीता विभागालाही विविध अडचणींना सामोरे जावे लागले होते. पण तरीही तेथे (पत्रकारीता विभागात) नव्या रचनेनुसार इतर शाखांप्रमाणे ७०-३० ही पध्दत (फॉर्म्युला) वापरत परिक्षा, निकालासह सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले.
इतर कॉलेजमध्ये सुरवात, अभ्यासक्रम नवीन, सूचना नाहीच. यंदाच्या(२०२४-२५) वर्षापासून विद्यापीठाच्या पत्रकारीता विभागासह घाईघाईने अन्य संल्लग्न कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रासाठी या नव्या अभ्यासक्रमांला सुरवात झाली. त्यासाठी विद्यापीठाने प्रत्येक विषय, त्यांचे श्रेयांक,(क्रेडीट), गुणांक, तासिकांची संख्या, प्रात्याक्षिक, सराव, लेखी परिक्षा यासर्व बाबींवर आधारीत नवा अभ्यासक्रम (सिलॅबस) सर्व महाविद्यालयांना पाठवला, मात्र या अभ्यासक्रमांतील अंतर्गत परिक्षा व विद्यापीठ परिक्षेसाठी निश्चित केलेली गुण पध्दत ही जुन्याच २०१९ च्या पॅटर्ननुसार ( उदा. ५० अंतर्गत गुण,५० गुण विद्यापीठ असे एकूण १०० गुण, काही विषयांचे २५ गुण अंतर्गत, २५ गुण विद्यापीठाचे असे एकूण ५० गुण) देण्यात आली. पत्रकारीतेच्या सर्व प्राध्यापकांनी या नव्या अभ्यासक्रमानुसार आपली अध्ययन प्रक्रीया पूर्ण केली, नव्या रचनेच्या ७०-३० फॉर्म्युलांचा कुठेही उल्लेख नसल्याने तसेच विद्यापीठाकडूनही महाविद्यालयांना परिपत्रक अथवा कुठलीही सूचना नसल्याने ऑक्टोबर २०२५ ची परिक्षा देखील ५०-२५ (विद्यापीठ पेपर) या पध्दतीनुसारच झाली. विद्यार्थ्यांना सर्व पेपरही याच गुणांप्रमाणे झाले. विद्यार्थी अनुतीर्ण, गुणांबाबत संभ्रम
प्रथम वर्षाच्या परिक्षेचे सर्व पेपर विद्यार्थ्यांनी आपल्या विषयानुसार ५०-२५ प्रमाणेच दिले. परिक्षा तपासणी केंद्रा (कॅप सेंटर) वरील, तपासणीसांनी (एक्झामिनर, मॉडरेटर) त्याप्रमाणेच गुणपत्रक तयार करून विद्यापीठाला पाठवले. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या निकालाने सारेच आवाक् झाले. या परिक्षेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गुणांमध्ये बरीच तफावत आढळली. विद्यार्थ्यांना नव्या रचनेच्या पध्दतीनुसार ७०-३०वर आधारीत गुण देण्यात आले. त्यामुळे अंतर्गत गुणही बदलले, विद्यापीठ परिक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तसेच पत्रकारीतेचे काही विद्यार्थी अनुतीर्ण झाले, काहींना कमी गुण मिळाले असे वेगळेच चित्र पहायला मिळाले. परिक्षेचा ऑनलाईन निकाल संकेतस्थळावर उपलब्ध झाला, पण त्यावर श्रेणी असल्याने नेमके काहीच समजले नाही.
उगीचच कांगावा, एकमेकांवर टोलवाटोलवी, जबाबदारी झटकली
याबाबत विद्यापीठाकडून गुणांचे सविस्तर लेझर (गुणपत्रक) आलेले नसल्याने विद्यार्थ्यांना पुर्नमुल्यांकन (रिचेकींग) करण्यासही अडचण आली. अखेर वारंवार विद्यापीठाकडे मागणी केल्यानंतर काही कॉलेजला लेझर उपलब्ध झाले. त्यात ७०-३० पध्दतीनुसार गुण देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम झाला. याबाबत विद्यापीठाच्या प्रभारी परीक्षा संचालक, परिक्षा नियंत्रक, उपनिबंधक यांच्या विभागांकडे विद्यार्थ्यांनी दुरध्वनी करून, प्रत्यक्ष जाऊन पाठपुरावा केला मात्र अधिकाऱ्यांकडून नेहमी प्रमाणे उडवाउडवीची उत्तरे मिळाली, हे काम आपले नसून अमूक एकाचे आहे असे सांगत कांगावा करण्यास सुरवात केली. एकमेकांवर जबाबदारी झटकली गेली, काहीं अधिकाऱ्यांना तर याबद्दल काहीच माहिती नव्हती, याचाही प्रत्यय विद्यार्थ्यांना आला. याबाबत काही परिक्षा विभाग, विद्यार्थ्यांनी, कॉलेज प्रमुखांनी कुलगुरुशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नसल्याने विद्यार्थी,पालक व कॉलेजमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पत्रकारीतेत भरपूर संधी उपलब्ध असल्याने आम्ही या अभ्यासक्रमांला प्रवेश घेतला मात्र पहिल्याच सत्रात आम्हाला विद्यापीठाच्या कारभाराचा वाईट अनुभव आला. आमची परिक्षा ५०-२५ पध्दतीनुसार झाली मग ७०-३० चा प्रश्न येथे येतोच कुठे, या रचनेबाबत आमच्या विभागास तसेच आम्हाला विद्यापीठाकडून काहीही कळवले नव्हते, सध्या दिलेल्या गुणांमध्ये तफावत आहे ती तातडीने दूर करावी तसेच विद्यापीठाला ही नवी पध्दत राबवायची असेल तर पुढील सत्रापासून राबवावी, मात्र त्याचीही पुर्वकल्पना द्यावी. या पहिल्या सत्रात याचा विचार होऊ नये, अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल – डॉ. योगेश कुलकर्णी, ओंकार टापसे, कृष्णा प्रधान, सतीश काळे- विद्यार्थी
कोट
एमए एमसीजे (पत्रकारीतेच्या) च्या विद्यार्थ्यांची निकाला संदर्भातली समस्या आज मला विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आली. परीक्षा विभागातील वरिष्ठांशी बोलून हा विषय तातडीने सोडविण्यासाठी मी प्रयत्न} करेल. एकही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.- सागर वैद्य, मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
*दिड वर्षापासून साधन सामुग्रीच नाही, नंतर या..*
पदवीच्या काही वर्गाच्या विद्यार्थ्यांचे पुर्नमुल्यांकनामध्ये गुण वाढले आहे, काहींच्या गुणपत्रकात बदल झाला आहे, त्यांना नवीन गुणपत्रक हवे आहे. मात्र विद्यापीठाकडे गेल्या एक दिड वर्षापासून साधन (स्टेशनरी) सामुग्री, साहित्य उपलब्ध नाही, त्यामुळे गुणपत्रक नंतर घेऊन जा, नंतर कॉलेजला पाठवले जाईल अशी उडवाउडवीची उत्तरे विद्यापीठाकडून दिली जात आहे. वर्षभरात हे विद्यार्थी तीन-चारदा पुण्याला जाऊन आले मात्र हेच कारण ऐकायला मिळत आहे. वास्तविक विद्यार्थ्यांकडून सर्व प्रकारच्या परिक्षा, गुणपत्रकांसह स्टेशनरीचा खर्च शुल्कांच्या स्वरूपात विद्यापीठ वसुल करते मग विद्यार्थ्यांना गुणपत्रक व अन्य मागणींचे पत्रके देण्यास नंतर या असे कारण सांगणे कितपत योग्य आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे.



