नवी मुंबईत रहेजा रेसिडन्सीत अग्नितांडव, चारजणांचा दुदैवी मृत्यू!ऐन दिवाळीत शोककळा..

प्रतिनीधी सतिश पाटील मुंबई दि. २४ ऑक्टोबर २०२५ वाशीतील सेक्टर १४ एम. जी. कॅाम्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत दुर्दैवाने मृत्यू झाले आहेत.
आज देशभरात दिवाळीचा सण साजरा होत आहे. हे सर्व सुरू असतानाच वाशीतील सेक्टर १४ एम. जी. कॅाम्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत दुर्दैवाने चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. १०, ११, १२ व्या मजल्यावर आग लागली होती.
दहाव्या मजल्यावर घरात एका आजीचा मृत्यू तर १२ व्या मजल्यावर घरात आई, वडील आणि ६ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीवर वाशी अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवले असून सदर दुर्घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते त्यामध्ये एका सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री १२:४० च्या सुमारास रहेजा रेसिडेन्सीमध्ये दहाव्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली आणि ११व्या आणि १२ व्या मजल्याला आगीने कवेत घेतले.
या आगीने भीषण स्वरुप धारण केल्याने वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मृतांमध्ये वेदिका सुंदर बालकृष्णन (वय ६), कमला हिरल जैन (वय ८४), सुंदर बालकृष्णन (वय ४४) आणि पुजा राजन (वय ३९) यांचा समावेश आहे. तर अग्रवाल, जैन आणि घोष कुटुंबातील जखमी सदस्यांना हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कामोठे येथील सेक्टर ३६ मध्ये आंबे श्रध्दा सहकारी सोसायटीत ही आग लागली होती.
आग लागल्याचे लक्षात येताच इमारतीमधील सर्व नागरिक बाहेर पडले. तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी इमारतीवर चढून तातडीने आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा सुरु केला. आंबे सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. आंबे श्रध्दा सहकारी सोसायटीमधील रुम क्रमांक ३०१ मध्ये ही आग लागली होती. तिसऱ्या मजल्यावरील घरात दोन सिलेंडरचा स्फोट झाला.
सोसायटीतील नागरिक इमारतीमधून बाहेर पडेपर्यंत ही आग वेगाने पसरली होती. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील घरातील तीन सदस्य बाहेर पडले. मात्र, आई आणि मुलगी आतमध्येच अडकून पडले होते.
या दोघांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग विझवून आतमध्ये जाईपर्यंत या दोघांचाही होरपळून मृत्यू झाला. या दोघी आत कशा अडकून राहिल्या, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, ऐन दिवाळसणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कामोठे परिसरात शोककळा पसरली आहे.



