
प्रतिनिधी-पिंपरी,- विधवांना प्रतिष्ठा देण्यासाठी महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी ‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागिरथी’ (गं. भा.) हा शब्द वापरण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला. मात्र यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. हा प्रकार म्हणजे देशाला दोनशे वर्षे मागे नेणारा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आम आदमी पक्षानेही त्याचा निषेध केला आहे.
दोनशे वर्षांपूर्वी सती प्रथेविरुद्ध राजाराम मोहन राय यांनी लढाई लढली होती. त्या काळी विधवेला ‘गंगा भगीरथी’ नावाने अपमानित केले जात असे. प्रत्यक्षात समाजामध्ये अनेक कुप्रथा होत्या. त्यामध्ये सती जाण्यापासून ते केशवपन तसेच मंगळसूत्र काढून घेणे, कुंकू पुसणे, जोडवी उतरवणे अशा अनेक प्रथा समाजा मधे होत्या. तर काही अजून ही आहेत. यासंदर्भात मागच्याच वर्षी अशा कुप्रथा पाळल्या जाऊ नयेत, असे ठराव ग्रामपंचायतीने करावेत, असा प्रयत्न झाला आणि आता खुद मंत्रिमहोदयांनीच ‘गंगा भगीरथी’ चा उलट्या प्रवासाचा प्रस्ताव आणला आहे. याचा आम्ही निषेध करतो असे ‘आप’ नेत्या सिताताई केंद्रे यांचे म्हटले आहे.
सरकारने विधवा महिलांचा सन्मान करण्यासाठी व त्यांना चांगले जीवन देण्यासाठी चांगल्या योजना आणाव्यात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी व क्रांतीज्योती सावित्रीमाई अशा कर्तुत्ववान महिलांनी महाराष्ट्राची जडणघडण केली आहे. फुले-शाहू-आंबेडकर-साने- कर्वे यांच्या प्रागतिक विचारांचा महाराष्ट्र आहे याची आठवणही सिताताई केंद्रे यांनी करुन दिली आहे.



