
प्रतिनीधी सतिश पाटील मुंबई दि. ९ नोव्हेंबर २०२५ मिरारोड : राज्य सरकारने दिवाळीपर्यंत दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्याची दिलेली मुदत संपल्यानंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा या टोल नाक्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी ८ नोव्हेंबरपर्यंत टोल नाका स्थलांतरित करण्यात येईल, असा दावा केला होता. मिरा -भाईंदर शहरात प्रवेश घेताना दहिसर टोलनाक्याच्या होणार्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना कायम त्रास होत आहे. त्यामुळे हा टोल नाका पुढे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. आणि काहीही झाले तरी दहिसर टोल नाका ८ नोव्हेंबरपर्यंत स्थलांतरित केला जाणार आहे. दिलेले वचन पूर्ण करण्यास सरकार कटिबद्ध आहे. असे ते बोलले होते पण अध्याप टोलनाका न हलवल्याने तिव्र विरोध होत आहे. लोकांच्या अडचणी कमी करून वाहतुकीचा प्रवाह सुरळीत करणे हीच प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जाणार आहेत, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोल नाक्याची पाहणी करून संबंधित प्रशासनास तातडीच्या सूचना केल्या आहेत. या पाहणीवेळी नागरिक आणि वाहनचालकांना दीर्घकाळापासून भेडसावत असलेल्या समस्या म्हणजे अवैध पार्किंग, टपर्या, बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर तसेच विविध अतिक्रमण यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. मागील पाहणीनंतर दिलेल्या सूचनांनुसार समाधानकारक कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे सात दिवसांच्या आत सर्व अतिक्रमण हटवून परिसर मोकळा करावा; अन्यथा कठोर कारवाई अनिवार्य असेल, असा स्पष्ट इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला. दहिसर टोल नाक्यालगत असणारा इलेक्ट्रिसिटी डेपो, अनधिकृत टपर्या, मोठ-मोठे होर्डींग्स, बॅनर्स सोबतच मध्येच असणारी दोन झाडे हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टोलनाका पुढे स्थलांतरित झाल्यावर पांडुरंगवाडीजवळ वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांना वाहतूक नियंत्रण करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिल्या.
मात्र जागा अद्यापही अनिश्चित
दहिसर टोलनाका वसई-विरार मार्गावरील वर्सोवा खाडी पुलापुढे स्थलांतरित करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत. मात्र, हा टोलनाका या मार्गावर हलवल्यास भविष्यात वाहतूक कोंडीसह अनेक समस्या उद्भवतील, असा आक्षेप स्थानिक ग्रामस्थांकडून नोंदविण्यात आला आहे. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनीही ही जागा वनविभागाच्या मालकीची असल्याने येथे टोलनाका उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ८ नोव्हेंबर रोजी हा पथकर नाका नेमका कुठे स्थलांतरित होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.



