ख्रिश्चन समाजावर होणारे अत्याचार त्वरित थांबवून चर्च मध्ये तोडफोड करणार्या समाज कंटकांवर महाराष्ट्र सरकारने त्वरित कार्यवाही करावी-राजन नायर

प्रतिनिधी कोल्हापूर दि. १५ जून २०२५ छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतीसूर्य जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा थोर व्यक्तींच्या विचारातल्या महाराष्ट्र राज्यात ख्रिस्ती समाजावर मोठ्या प्रमाणात विविध भागात प्रार्थना चालू असताना चर्च मध्ये घुसून अडथळा आणणे, तोडफोड करणे, (बायबल)पवित्र ग्रंथ फाडणे, महिलांवर हात उचलणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारे ख्रिश्चन संस्था व समाजावर, होणारे हल्ले व अत्याचार त्वरीत थांबविण्यात यावे.
मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी तालुक्यातील एका चर्च मध्ये पेंटिकाॅस्टल दिनाच्या प्रार्थना चालू असताना, तथाकथित समाज कंटक चर्च मध्ये घुसून महिलांना शिवीगाळ केली व मारहान केली. कायदा, सुव्यवस्था व सुरक्षितेचे पालन करणारे यांनी उलट समाज कंटकाना पाठिंबा देऊन अल्पसंख्याक समाजावर अन्याय केला.
भारतीय राज्यघटनेने दिलेला संविधानीक अधिकार (आर्टिकल १९ आणि २५) यांचे घोर उल्लंघन केले जात आहे. मी छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणारा व सामाजिक कार्यकर्ता या नात्याने याबाबत निषेध व्यक्त करत आहे. असे राजन नायर यावेळी बोलले.
दि. १३ जून २०२५ रोजी कोल्हापूर येथे कलेक्टर कार्यालया समोर इचलकरंजी येथे झालेल्या अन्याया निषेधार्थ एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. यामध्ये पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून इचलकरंजी, पन्हाळा, कोडाली व अन्य विविध भागातून हजारोंच्या संख्येने ख्रिस्ती बांधव, बिशप, पास्टर व सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी आमदार राजीव आवळे, इब्राहिम आवळे, सामाजिक कार्यकर्ते राजन नायर, बिशप संजय आव्हाड, पास्टर श्रीनिवास चोपडे, कोल्हापूर चर्च कौन्सिलचे कार्यकारी सचिव दीनानाथ कदम, एस्तेर पॅटर्न स्कूल मुख्याध्यापक विकास समुद्रे, होवाॅर्ड हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक संजय जगताप, आशिष उर्नाकर, योगेश समुद्रे, शारोन चोपडे, रूपाली लोंढे, पास्टर सतिश आयनाॅर, पास्टर शिरीष गायकवाड उपस्थित होते.
यावेळी राजन नायर यांनी समाजासमोर आपले मत व्यक्त करताना भारताची धर्मनिरपेक्षता व ख्रिश्चन समाजाव्दारे इतर समाजासाठी देखील केलेल्या कामाचा उल्लेख केला. शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, सामाजिक बांधिलकी, कुष्ठरोग निर्मूलन, महिला सशक्तीकरण, विशेषतः भारतरत्न मदर टेरेसा, पंडिता रमाबाई, नारायण वामन टिळक, साधु सुंदर सिंग, विलीयम केरी, लक्ष्मीबाई टिळक, यांनी जे कार्य केले ते इतर समाजासाठी देखील केले असे नायर यावेळी बोलले.
नायर यांनी आपल्या भाषणात आवर्जून भारतातील पहिली महिला डाॅक्टर आनंदीबाई गोपाल जोशी यांचा उल्लेख केला. त्यांनी ख्रिस्ती समाजाव्दारे कोल्हापूर येथील पहिली शाळा एस्तेर पॅटर्न मिशनरी शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले व नंतर अमेरिकेत राहून एम.डी. वैद्यकीय शिक्षण घेतले व रेव्ह राॅयल गोल्ड वाईल्डर आणि रेव्ह जी. डब्ल्यू शायलर यांच्याकडून त्यांना प्राथमिक शिक्षण व वैद्यकीय शिक्षणासाठी खूप पाठिंबा मिळाला.
शांतीप्रिय, दया, क्षमा व शांतीचा संदेश देणार्या आनंदी बाई जोशी यांच्या सारखे अनेक व्यक्तिमत्व घडविणार्या अशा समाजावर होणारे अन्याय व अत्याचार त्वरित थांबवावे व याबाबत महाराष्ट्र सरकारने खासकरून दखल घ्यावी व पोलिस प्रशासनाने देखील कायद्याचे पालन करून कार्य करावे व इचलकरंजी तालुक्यातील शिवाजी नगर पोलिस स्टेशन येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी राजन नायर यांनी शेवटी बोलताना केली.



