महाराष्ट्रमूंबईविशेषसामाजिक

विशेष मतदार पुनरीक्षणात BLO ची निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही; दोषींवर कारवाईचा इशारा..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. १२ जुलै २०२६ भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेत निष्काळजीपणा, दिरंगाई किंवा कामचुकारपणा करणाऱ्या बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्याविरुद्ध आयोगाच्या नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिला आहे.
३० जून २०२६ पासून जिल्ह्यात SIR कार्यक्रम सुरू असून मतदारांकडून प्रगणक फॉर्म (Enumeration Form – EF) भरून घेण्याचे काम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण २७.६५ टक्के EF फॉर्मचे वितरण पूर्ण झाले आहे.
मतदारसंघनिहाय प्रगती पाहता विक्रमगडमध्ये ८८ टक्के, पालघरमध्ये ६१ टक्के, डहाणूमध्ये ३९ टक्के, बोईसरमध्ये ८ टक्के, वसईमध्ये ७ टक्के आणि नालासोपारामध्ये केवळ २ टक्के काम पूर्ण झाले आहे. मागील आठ ते दहा दिवसांतील अतिवृष्टी आणि वसई, विरार, नालासोपारा तसेच इतर भागांतील पूरस्थितीमुळे बोईसर, वसई आणि नालासोपारा मतदारसंघांमध्ये अपेक्षित गतीने काम होऊ शकले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, SIR मोहिमेदरम्यान काही तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. काही BLO शाळा किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी कॅम्प आयोजित करून फॉर्म स्वीकारत असल्याचे, तसेच काही व्यक्ती किंवा राजकीय प्रतिनिधींच्या सूचनेनुसार काम करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि BLO यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष सखोल पुनरीक्षणातील सर्व कामकाज केवळ भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, नियम आणि निर्देशांनुसारच करण्यात यावे. कोणत्याही राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या शिबिरात किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधी, पदाधिकारी अथवा इतर व्यक्तीच्या दबावाखाली अथवा सूचनेनुसार कोणतेही काम करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
BLO यांनी घरोघरी जाऊन EF फॉर्मचे वितरण करणे, भरलेले फॉर्म स्वीकारणे, पडताळणी आणि मॅपिंगची प्रक्रिया आयोगाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार पार पाडावी. विशेष पुनरीक्षण प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध पद्धतीने राबविण्याची जबाबदारी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या कामात टाळाटाळ, कामचुकारपणा किंवा दिरंगाई आढळल्यास संबंधित BLO विरुद्ध भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सर्व नागरिक, राजकीय पक्ष तसेच बूथ लेव्हल एजंट (BLA) यांनी विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!