
सामाजिक संस्थांच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या शिवणकाम प्रकल्पाचे प्रारंभ
पहिल्याच टप्प्यात १३० महिलांना मिळाली रोजगाराची संधी माविम, राही फाउंडेशन व जय युवा अकॅडमीचा पुढाकार.
प्रतिनिधी नवनाथ बी सोनवणे अहिल्यानगर दि. १२ जुलै २०२६ महिला स्वयंरोजगारातून कुटुंब सक्षम होतील. बेरोजगारीवर मात करून महिला सक्षमीकरणाचा राही फाउंडेशन, जय युवा अकॅडमी, महिला आर्थिक विकास महामंडळाचा (माविम) महिला स्वयंरोजगार प्रकल्प जिल्ह्यात आदर्श असल्याचे प्रतिपादन भारतीय डाक विभाग प्रमुखचे वरिष्ठ अधीक्षक विकास पालवे यांनी केले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी घरबसल्या शिवणकाम प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी पालवे बोलत होते. या उद्घाटन सोहळ्यास मार्गदर्शक म्हणून स्वप्निल मेमोरियलचे संचालक इंजि. निलेश रासकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते, अर्थ आधार शक्ती बचत गटाचे प्रा. भगवान काटे, मेजर शिवाजी वेताळ, उद्योजक भाऊसाहेब सुंबे, राही फाउंडेशनच्या संचालिका रूपाली करांडे, निलेश गर्जे, ॲड. राजेंद्र करांडे, जय युवाचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण रक्षणाचा संदेश देऊन तुलसीमातेला पाणी अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी माविमचे उमेश कहाते यांनी महिलांना फक्त प्रशिक्षण घेऊन उपयोग नाही, तर प्रत्यक्ष स्वयंरोजगार करण्याच्या दिशेने कार्य करणे गरजेचे आहे. घरबसल्या शिवणकामातून महिला आर्थिक सक्षम होतील. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हाभरातील बचत गटातील महिला या प्रकल्पात निश्चितच सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रा. भगवान काटे यांनी महिला सक्षमीकरण फक्त भाषणातून किंवा कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीशीलपणे प्रकल्पाच्या माध्यमातून साधला गेला पाहिजे. हा प्रकल्प राबवून राही फाऊंडेशन व जय युवा अकॅडमीने या चळवळीला चालना दिली असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात संचालिका रूपाली करांडे म्हणाल्या की, या प्रकल्पाद्वारे १ हजार महिलांना स्वयंरोजगारातून दरमहा उत्पन्न मिळवण्याची संधी दिली जाणार असून, या प्रकल्पाद्वारे प्रत्येक सहभागी महिलांच्या कुटुंबांना सक्षम करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महेश शिंदे यांनी केले. आभार निलेश गर्जे यांनी मानले. प्रकल्प यशस्वीतेसाठी ॲड. मनीषा भिंगारदिवे, ॲड. विद्या शिंदे, ॲड. आरती शिंदे, भाऊसाहेब पादीर, राम अभंग, वनिता पाडळे, संगीता रणनवरे, फरजानाबाजी, कविता अभंग, सिंधू वाणी, तेजल येवले, सुवर्णा पारे, श्वेता वाघ, मिना औताडे, अनिता पाटोळे, हेमलता कांबळे, दिपाली उदमले, पल्लवी लांडगे, शबाना शेख, कुऱ्हे सर, राधेश्याम ब्राह्मणे, रजनीताई ताठे, सौ. वैरागर आदींनी परिश्रम घेतले.
प्रकल्पात जिल्ह्यातील माहेर फाउंडेशन, उडान फाउंडेशन, उमेद फाउंडेशन, समृद्धी महिला बहुद्देशीय संस्था, प्रगती फाउंडेशन, स्वप्निल मेमोरियल फाउंडेशन, शिवगामीनी फाउंडेशन, सप्तशृंगी आदिवासी महिला विकास प्रतिष्ठान, मानवसेवा प्रतिष्ठान, कर्तृत्ववान लोकसंचालित साधन केंद्र अहिल्यानगर, मुंबादेवी प्रतिष्ठान, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्था, जागृती बहुउद्देशीय संस्था, अक्षय ग्रामीण युवा क्रीडा बहुउद्देशीय संस्था, साईकृपा बहुउद्देशीय संस्था, अजय फाउंडेशन, संघर्षनामा आदींचा सक्रिय सहभाग आहे.
पहिल्याच टप्प्यात १३० महिलांना मिळाले घर बसल्या रोजगार
बोल्हेगाव, डोंगरगण, भिंगार, कामरगाव, नेप्ती, अरणगाव, भूतकरवाडी, सावेडी, कोल्हेवाडी, मुकुंदनगर, बुरुडगाव, निंबळक, वडगाव गुप्ता आदी भागातील १३० महिलांनी घरबसल्या शिवणकामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी त्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. या भागातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



