
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. १२ जुलै २०२६ “यह तो एक सिर्फ ट्रेलर है ” खरच सीबीआय व ईडीने प्रामाणिक पणे कारवाई केली तर एक दिवस देशातील लपवलेला काळा पैसा नक्कीच बाहेर येणार!
उत्तर प्रदेशातील आग्रा याठिकाणी माजी एआरटीओ (सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी) ललित कुमार यांच्या घरावर दक्षता विभागाने टाकलेल्या धाडीत कथित बेहिशेबी संपत्तीचा मोठा साठा उघडकीस आला आहे.
या कारवाईत अंदाजे १३ किलो सोने, १.६२ कोटी रुपये रोख, गुंतवणुकीची कागदपत्रे आणि अनेक मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
तक्रारीतून उलगडला मोठा प्रकार
ललित कुमार यांनी असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याच्या तक्रारीनंतर दक्षता विभागाने गोपनीय चौकशी सुरू केली. प्राथमिक पुरावे मिळाल्यानंतर विशेष न्यायालयाच्या परवानगीनंतर आग्रा आणि इतर ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.
घरातील प्रत्येक कोपऱ्यात लपवला होता ‘खजिना’
धाडीदरम्यान अधिकाऱ्यांनी घरातील पलंग, सोफा, फॉल्स सीलिंग आणि भिंतींची तपासणी केली. अनेक ठिकाणी खास गुप्त कप्पे तयार करण्यात आल्याचे आढळले. या कप्प्यांमधून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
भिंती फोडल्यानंतर समोर आले गुप्त लॉकर
तपास पथकाला काही भिंतींच्या बांधकामावर संशय आल्याने त्या फोडण्यात आल्या. त्यामध्ये तयार केलेल्या गुप्त लॉकरमधून मोठ्या प्रमाणात सोने, रोकड आणि कागदपत्रे सापडल्याची माहिती समोर आली आहे. हीच तपासातील सर्वात महत्त्वाची जप्ती मानली जात आहे.
डिजिटल तिजोरीही तपासाच्या रडारवर
कारवाईदरम्यान एका डिजिटल तिजोरीचाही शोध लागला. अधिकाऱ्यांनी पासवर्ड विचारल्यानंतर ललित कुमार यांनी तो आठवत नसल्याचे सांगितल्याचा दावा आहे. त्यानंतर तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने तिजोरी उघडण्यात आली. त्यातून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे मिळाली असून, त्यांची तपासणी सुरू आहे.
तीन शहरांतील मालमत्तेची चौकशी
प्राथमिक तपासात लखनौ, आग्रा आणि नोएडा येथे ललित कुमार व त्यांच्या कुटुंबाच्या नावावर अनेक मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. या मालमत्तांसाठी वापरण्यात आलेल्या पैशांचा स्रोत, बँक व्यवहार आणि गुंतवणुकीची माहिती तपासली जात आहे.
या प्रकरणात केवळ जप्त केलेली रोकड आणि सोने हेच महत्त्वाचे नाही, तर एवढी कथित बेहिशेबी संपत्ती अनेक वर्षे लपवून ठेवण्यात कसे यश आले?, याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणात इतर अधिकारी किंवा मध्यस्थांचा सहभाग होता का?, याचाही शोध तपास यंत्रणा घेत आहेत. जप्त कागदपत्रे आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.



