PCMC मध्ये १०८ रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा – केस ID नाही, गाड्या नादुरुस्त, रिस्पॉन्स टाईम ४५ मिनिटे तातडीने सुधारणा करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ एप्रिल २०२६ शहरातील २५ लाखांहून अधिक नागरिकांसाठी जीवनदायिनी असलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेमध्ये गंभीर प्रशासकीय व तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत. “गोल्डन अवर” मध्ये रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने जीवितहानी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मा. जिल्हा शल्य चिकित्सक, औंध यांना निवेदन देऊन तातडीने चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली.
निवेदनातील ठळक मुद्दे व गंभीर त्रुटी :
१) केस ID मिळत नाही – पाठपुरावा अशक्य : १०८ ला कॉल केल्यानंतर नागरिकांना SMS किंवा इतर कोणत्याही माध्यमातून केस ID दिला जात नाही. त्यामुळे रुग्णवाहिका किती वेळात येणार याची माहिती मिळत नाही.
२) रुग्णवाहिकेची माहिती गुलदस्त्यात : कोणती गाडी येणार, वाहन क्रमांक, ड्रायव्हर-EMT चे नाव, BLS/ALS/Cardiac प्रकार, ऑक्सिजन-व्हेंटिलेटर आहे का – याची माहिती दिली जात नाही. ओला-उबर प्रमाणे GPS ट्रॅकिंग नाही.
३) लोकसंख्येच्या तुलनेत ५०% गाड्या कमी : NHM निकषानुसार २५ लाख लोकसंख्येसाठी २५ BLS व ५ ALS कार्डियाक रुग्णवाहिका आवश्यक असताना प्रत्यक्षात फक्त १२-१४ गाड्या कार्यरत आहेत. त्यामुळे रिस्पॉन्स टाईम ३०- ४५ मिनिटे लागत आहे.
४) फीडबॅक यंत्रणा नाही : सेवा घेतल्यानंतर रुग्णांना कर्मचाऱ्यांचे वर्तन, वेळ, सुविधा याबाबत फीडबॅक देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. १०२ टोल फ्री तक्रार क्रमांक बंद आहे.
५) रुग्णवाहिका नादुरुस्त – जीव धोक्यात : अनेक गाड्यांमध्ये ऑक्सिजन यंत्रणा बंद, स्ट्रेचर तुटलेले, AC बंद, औषधे एक्सपायरी, GPS बंद आहेत. कर्मचारी प्रशिक्षित नाहीत.
प्रमुख मागण्या :
१) प्रत्येक १०८ कॉलला १ मिनिटात केस ID + वाहन डिटेल + ETA चा SMS बंधनकारक करा.
२) ३ महिन्यात १५ नवीन BLS व ५ नवीन ALS कार्डियाक रुग्णवाहिका PCMC साठी तैनात करा.
३) PCMC चा रिस्पॉन्स टाईम व रुग्णवाहिका लोकेशनचा रिअल-टाईम डॅशबोर्ड जाहीर करा.
४) त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून ३० दिवसात अहवाल द्या.
५) कंत्राटदार BVG India Ltd यांच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करून दंडात्मक कारवाई करा.
निवेदनकर्ते आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष वैजनाथ शिरसाट म्हणाले, ” १०८ ही सेवा वेळेत पोहोचली तर जीव वाचतो. पण केस ID नाही, गाडी कुठे आहे कळत नाही, ४५ मिनिटे वाट पाहावी लागते. शहरात रोज हार्ट अटॅक, अपघाताचे रुग्ण दगावत आहेत. १५ दिवसात सुधारणा झाली नाही तर नागरिकांना घेऊन जिल्हा रुग्णालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू.”





