छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य थांबवा ; अन्यथा योग्य धडा शिकवू..

सनातनचे स्वामी आनंद स्वरूप याच्या वादग्रस्त वक्तव्यावर संभाजी ब्रिगेड आक्रमक..
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ३० एप्रिल २०२६ छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सनातनचे धर्मगुरू स्वामी आनंद स्वरूप यानी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पिंपरी-चिंचवडसह राज्यभर संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत स्वामींच्या वक्तव्याचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी हे विधान इतिहासाचा अपमान असल्याचे सांगत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा स्वामी आनंद स्वरूप दिसतील तिथे त्याला त्याची जागा दाखवू असा इशारा काळे यांनी दिला.
सनातनचे धर्मगुरू स्वामी आनंद स्वरूप यानी केलेल्या वक्तव्यात शिवाजी महाराजांच्या लढाईच्या पद्धतीबाबत वादग्रस्त टिप्पणी करण्यात आली होती. या विधानामुळे इतिहासाचा विपर्यास होत असल्याचा आरोप करत काळे यांनी संताप व्यक्त केला. “
युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झालं. शिवाजीनी कधी युद्ध मैदानात लढलं नाही तर फक्त छापामार युद्ध लढले. पेशव्यांनी मात्र युद्धाच्या मैदानात लढाई केली. धीरेंद्र शास्त्री जे बोलले त्याचं मी शब्दशः समर्थन करतो. त्यांनी माफी मागायची गरज नव्हती.
असे स्वामी आनंद स्वरूप यानी आगीत टाकणारे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून अशा वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. त्यांनी संबंधित वक्तव्य करणारे “वाचाळवीर” समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला.
या प्रकरणामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक संघटनांकडूनही निषेध व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही या वक्तव्याचा तीव्र विरोध दिसून येत आहे. काही ठिकाणी आंदोलनाची तयारी सुरू असल्याची माहितीही समोर येत आहे.
संभाजी ब्रिगेडने स्पष्ट इशारा दिला आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीची विधाने सहन केली जाणार नाहीत. इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांविरोधात कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यातही त्यांनी योग्य वक्तव्य न केल्यास धीरेंद्र शास्त्री आणि स्वामी आनंद स्वरूप यांना संभाजी ब्रिगेड योग्य धडा शिकवेल असा इशारा ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिला.



