प्रभाग क्रमांक १३ मधील प्रस्तावित कचरा संकलन केंद्रास सुनील कांबळे यांचा जाहीर निषेध..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ सप्टेंबर २०२६ प्रभाग क्रमांक १३ मधील सेक्टर २२ येथे पाण्याच्या टाकीजवळ प्रस्तावित करण्यात आलेल्या कचरा संकलन केंद्रास सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी जाहीर विरोध केला आहे. प्रस्तावित जागेपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर सरकारी दवाखाना असून, परिसरात शाळादेखील आहे. त्यामुळे येथे कचरा संकलन केंद्र सुरू केल्यास दुर्गंधी, प्रदूषण, डास-माशांचा प्रादुर्भाव आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
“कचरा संकलन केंद्र उभारण्याऐवजी सरकारी दवाखाना मोठा करून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात. टाऊन हॉलसारखे सार्वजनिक प्रकल्प राबवावेत. प्रभागातील बंद अवस्थेत असलेल्या पाच इमारतींचा योग्य वापर करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात,” अशी मागणी सुनील कांबळे यांनी केली आहे.
लोकवस्ती, शाळा आणि दवाखान्यापासून सुरक्षित अंतरावर कचरा संकलन केंद्रासाठी पर्यायी जागा निवडावी आणि नागरिकांच्या हरकती व सूचनांचा विचार करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.



