
प्रतिनिधी अमरावती दि. १७ ऑक्टोबर २०२६ समाजसेवक डॉ.गोविंदभाऊ कासट आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या प्रभात टॉकीज येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत अंध, दिव्यांग विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मित्रमंडळी आणि निमंत्रितांसाठी दर्जेदार चित्रपटाचे आयोजन करीत असतात, या वाढदिवसाला त्यांनी ‘ हनुमान अंश’ हा दर्जेदार धार्मिक चित्रपट सर्वांना दाखविला. प्रभात चित्रपटगृहात प्रत्येकाला अल्पोपहार देण्यात आला, यासोबतच शुभेच्छा कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे त्यांच्या वाढदिवसाला सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीची अनोखी जोड लाभली.
अमरावती शहरासह संपूर्ण विदर्भात अंध, दिव्यांग, कुष्ठबांधव, गोरगरीब विद्यार्थी आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ.गोविंदभाऊ कासट यांचा दि.७ ऑक्टोबर २०२६ रोजी ८१ वा वाढदिवस कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान, अमरावती तर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी पुष्पगुच्छ, शाल आणि प्रा.बुंदेले लिखित ‘निखारा’ हा काव्यसंग्रह भेट देऊन डॉ. गोविंदभाऊ कासट यांचा सत्कार करून उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच अभंगकार प्रा.बुंदेले यांनी ,
” गोविंद भाऊंना ।
हार्दिक शुभेच्छा ॥
मनस्वी सदिच्छा ।
जन्मदिनी ॥ “
या स्वरचित अभंगाचे गायन करून अभिष्टचिंतन केले.
समाजसेवक डॉ . गोविंदभाऊ कासट यांचा मनोज राऊत,नरेंद्र तायडे,दिलीप सदार आणि सागर यादव तथा विविध संस्थांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांचा सपत्नीक स्नेहपूर्ण सत्कार केला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
समाजसेवक डॉ.गोविंद कासट यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात मित्रमंडळींशी नव्याने जोडले गेलेले माजी मुख्याध्यापक मनोज राऊत यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. ते गजानन महाराज पारायण समितीचे अध्यक्ष असून गजानन महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून सेवानिवृत्त झालेले नरेंद्र तायडे हे मित्रमंडळींच्या सामाजिक उपक्रमांत उत्साहाने सहभागी होतात. करीना थापा या मुलीच्या पराक्रमाची दखल घेऊन तिला राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळा, अमरावतीचे मुख्याध्यापक दिलीप सदार हे गेल्या ३४ वर्षांपासून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहेत. शैक्षणिक कार्यासोबतच ते मित्रमंडळींच्या माध्यमातून अंध व दिव्यांग बांधवांच्या सेवाकार्यातही सक्रिय सहभाग नोंदवितात. सुप्रसिद्ध उद्योजक आणि हरदेव टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक सागर यादव हेसुद्धा अलीकडेच या सेवाभावी मित्रपरिवाराशी जोडले गेले आहेत.
या स्नेहपूर्ण अभिष्टचिंतन कार्यक्रमाला रिदम सदार, गजानन महाराज पारायण समितीचे आशिष करुले, जान्हवी व दिलीप सदार, उज्ज्वला व मनोज राऊत, राजेंद्र चंदन, उमा कासट, दीप्ती कासट, उमेश वैद्य, जीवन गोरे यांच्यासह सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. समाजातील वंचित घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी आयुष्यभर कार्यरत असलेल्या डॉ. गोविंदभाऊ कासट यांच्या सेवाकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या निरोगी, आनंदी आणि उदंड आयुष्यासाठी उपस्थितांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.



