नाशिक येथे जागतिक ध्यान दिवसानिमित्ताने २१ डिसेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन संपन्न..

प्रतिनिधी रेणुका गायकवाड नाशिक दि. २२ डिसेंबर २०२५ जागतिक ध्यान दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र योग शिक्षक संघ व भाजप योग प्रकोष्ठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने २१ डिसेंबर रोजी सकाळी चिन्मय मिशन हॉल, पंचवटी नाशिक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात चिन्मय मिशनचे आचार्य स्वामी अद्वैतानंदजी यांनी ध्यानाचे महत्त्व, पद्धती आणि फायद्यांवर सविस्तर प्रवचन करून उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. स्वामीजींनी स्पष्टपणे सांगितले की, ध्यान का करावे? कारण ते मनाची शुद्धी करते, तणाव दूर करते आणि आत्मिक शांती मिळवून देते. ध्यान कसे करावे? यासाठी त्यांनी सोपी पद्धत शिकवली – शांत ठिकाणी बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणे, अनावश्यक विचारांना दूर सारणे आणि ‘ओम’ किंवा मंत्रजप करणे. ध्यानाचे फायदे म्हणजे रक्तदाब नियंत्रण, एकाग्रता वाढणे, शारीरिक आरोग्य सुधारणे आणि मानसिक स्पष्टता, असे स्वामीजींनी सांगितले. याप्रसंगी चिन्मय मिशनचे साधक, म. यो. शि. संघाचे योग गुरु जिवराम गावले (जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र योग शिक्षक संघ नाशिक) डॉ. योगेश कुलकर्णी (संयोजक भाजप योग प्रकोष्ठ) रेणुका गायकवाड सहसंयोजका (भाजप योग प्रकोष्ठ) लेखा जोसेफ सहसंयोजका (भाजप योग प्रकोष्ठ) नाशिक मधील नामांकित योगशिक्षक, योग तज्ञ तसेच भाजप योग प्रकोष्टाचे कार्यकर्ते व योगप्रेमी बहुसंख्येने हजर होते. कार्यक्रमाच्या शेवटी स्वामी अद्वैतानंदजींनी आदि शंकराचार्यांचे प्रसिद्ध स्तोत्र
*॥ निर्वाण षटकम्॥*
चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम्
हे आपल्या मधुर आवाजात गाऊन सर्वांचे प्रत्यक्ष ध्यानाचे प्रात्यक्षिक घेतले. या अनुभवाने सर्वजण ध्यानमग्न अवस्थेत नितांत शांततेचा आनंद घेतला, जो रोमांचकारी आणि अद्भुत ठरला. सर्वांनी या ध्यानरूपी अमृतप्रसादाचे सेवन करून शांतिपाठ घेऊन आजच्या “जागतिक ध्यान दिवस” कार्यक्रमाची सांगता केली. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये सामान्य नागरिकांमध्ये योगाची आवड निर्माण होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले, योगशिक्षकांना येणारे अडचणी तसेच इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली, व नव्याने गठीत होणाऱ्या शहर कार्यकारणीसाठी इच्छुक योग शिक्षक व योग तज्ञ यांच्याशी चर्चा करून समाजामध्ये जास्तीत जास्त योगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आवश्यक ते उपक्रम राबवण्याचा मानस आजच्या कार्यक्रमांमध्ये घेतला गेला.



