कोपरगाव शहरातील विस्तापितांच्या प्रश्ना संदर्भात आमदार अशुतोष काळेंना भेटणार – अजय विघे (श्रमिकराज)

प्रतिनिधी कोपरगाव- कोपरगाव शहरातील अतिक्रमण १० मार्च २०११ ला काढण्यात आले. आज त्या गोष्टीला बारा वर्षे पूर्ण होऊन गेले. परंतु अद्याप कोपरगाव मध्ये विस्थापितांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांना विस्थापितांना सोबत घेऊन भेटणार आहे असे श्रमिकराज कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष अजय विघे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कोपरगावचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे हे महाविकास आघाडीच्या काळात सत्तेत होते. त्यावेळी विस्थापितांना घेऊन तसेच माजी नगराध्यक्ष पद्माकांतजी कुदळे यांना घेऊन आमदार आशुतोष काळे यांना भेटून विस्थापितांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी आम्हा सर्व विस्थापितांना शब्द दिला की होईल तेवढे प्रयत्न मी करतो. हा विषय त्या वेळचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सोबत मुंबई येथे बैठक घेऊन कोपरगावच्या विस्थापितांचा प्रश्न सांगितला त्यावर कोपरगावच्या विस्थापितांसाठी १४ कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये बदललेले राजकारणातील गणिते पाहता तो निधी तसाच राहून गेला. परंतु उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना आमदार आशुतोष काळे यांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे विस्थापितांच्या पुन्हा अशा पल्लवीत झाले असून विस्थापितांचा रखडलेला प्रश्न पुन्हा मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व विस्थापित आमदार आशुतोषदादा काळे यांना भेटणार आहोत. असे प्रसिद्धी पत्रकात श्रमिकराज कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष अजय विघे यांनी म्हटले आहे.



