
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२९ ऑक्टोंबर २०२३ महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगला तापत असलेला दिसून येत आहे. जागोजागी मराठा कार्यकर्ते राजकीय नेत्यांना काळे झेंडे दाखवत आहेत. तसेच त्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये मराठा आरक्षणाला गालबोट लागण्याची घटना घडली आहे.
मराठा आरक्षणासाठी इंद्रायणी नदीत आत्महत्या
पिंपरी चिंचवड शहरातील आळंदी परिसरामध्ये एका व्यक्तीने मराठा आरक्षण मिळावं, अनुकंपा तत्वावर मुलाला नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समजते. त्यानं चिठ्ठी लिहित इंद्रायणी नदीमध्ये उडी मारून जीवनयात्रा संपली. ही घटना परवा २७ ऑक्टोबर २०२३ शुक्रवार रोजी रात्री ०८ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री इंद्रायणी पात्रात या व्यक्तीचा शोध घेतला. व्यंकट डोपरे (रा.नऱ्हे आंबेगाव,पुणे) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
इंद्रायणी नदीपात्रात उडी घेत जिवनयात्रा संपवली..
तीर्थक्षेत्र आळंदी येथे काल शुक्रवारी व्यंकट नरसिंग डोपरे मूळ गाव जिल्हा लातूर सध्या पुण्याच्या नऱ्हे आंबेगाव भागातून माऊलीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांनी इंद्रायणी पात्रात उडी मारत आत्महत्या केली. उडी मारल्यानंतर तत्काळ काही वेळानंतर स्थानिकांनी आळंदी पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस पथक, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र अंधार असल्याकारणानं रात्री ११ वाजता शोधकार्य थांबविण्यात आले.
त्यानंतर काल सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले होते. शोध मोहीम सुरू असताना सकाळी अकरा वाजण्याचे सुमारास त्यांचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला.
मराठा आरक्षण मिळत नसल्यानं नैराश्यातून आत्महत्या..
मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांना घरातच एक चिट्टी
सापडल्याची माहिती मिळते. त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. मी सरपंच असल्यापासून प्रयत्न करतो, तरी सरकार याला गांभीर्यानं घेत नाही. २०१२ पासून माझ्या मुलाला अनुकंपावर नोकरी दिली जात नाही. आईच्या व वडिलांच्या जागी त्याला नोकरी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रशासन आम्हाला न्याय देत नाहीत. याचं नैराश्यातून मी आत्महत्या करीत आहे, अशा आशयाचा मजकूर त्या चिठ्ठीत लिहिलेला होता अशी माहिती मिळते. त्यावेळी नजिकच्या नातेवाईक म्हणून भोसरीत राहणाऱ्या जावयास याबाबत कळवण्यात आले होते. इकडे आळंदीत त्यांचा शोध घेताना बंधाऱ्यालगत त्यांची पिशवी, मोबाईल, गळ्यातील माळ, चप्पल अन ज्ञानेश्वरीमधील काही कागद सापडले. त्याच बंधाऱ्यात पोलीस व अग्निशमनने शोध घेतला. आज तिथंच त्यांचा मृतदेह आढळला. या वेळी पिंपरीत आंदोलन करत असनार्या आंदोलकांनी दू:ख व्यक्त केले.





