मोरेंनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार..

विषेश प्रतिनिधी मूंबई दि. ०५ जूलै २०२४ वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चाही झाली असून वसंत मोरे शिवसेनेकडून मशाल चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असेही समजते. पुढील आठवड्यात ०९ जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेना पक्षात वसंत मोरेंचा प्रवेश होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. वसंत मोरे यांनी मनसेत वरिष्ठांकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणामुळे मनसेला जय महाराष्ट्र केला होता. यावेळी, राज ठाकरेंबद्दल आपली नाराजी नसून काही वरिष्ठांमुळे आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वीच त्यांनी मनसे सोडल्याने ते शिवसेनेत किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे, ते राष्ट्रवादीतही जाऊ शकतात, असेही बोलले जात होते. मात्र, ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरेंची पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे, त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन आपली पुढील राजकीय वाटचाल नव्याने सुरू केली होती. मात्र, निकालानंतर महिनाभरातच त्यांनी वंचितला सोडून शिवसेनेची कास धरल्याचं दिसून आलं आहे.



