महाराष्ट्रविशेषशहर

नगरविकास दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला राज्यातील ‘अ’ व ‘ब’ महानगरपालिकांच्या गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार..

प्रतिनिधी-पिंपरी, २० एप्रिल २०२३ :- नगरविकास दिनानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फत शहर सौंदर्यीकरण व नागरी प्रशासनातील विविध बाबींमध्ये उत्तम कामगिरी करणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांना आज राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला राज्यातील ‘अ’व’ब’ महानगरपालिकांच्या गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आज स्विकारला. ५ कोटी रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मुंबई येथे संपन्न झालेल्या या समारंभास महानगर पालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठिया, उप आयुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, प्रशासन अधिकारी तथा स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक सोनम देशमुख आदी उपस्थित होते.
या यशाबद्दल महानगरपालिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय गतिमानता साधून दर्जेदार विकास कामे आणि उपक्रम राबविण्याकडे महानगरपालिकेने भर दिला आहे. महानगरपालिकेचा झालेला हा सन्मान खऱ्या अर्थाने शहरवासियांचा सन्मान असून त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच हे यश प्राप्त झाले आहे अशी भावना आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी व्यक्त केली.
गतवर्षी देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. शहर वासियांच्या गरजा आणि भविष्यात करावयाच्या आवश्यक सेवासुविधांचा सर्वंकश विचार करून महानगरपालिकेच्या वतीने विविध विकास प्रकल्प, उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांचा महत्वाचा वाटा आहे. सामुहिक प्रयत्न आणि नागरी सहभागामुळे या शहराला जागतिक दर्जाचे शहर बनवणे सहज शक्य आहे असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!