खासदारकीची पर्वा न करता मोदींना पाठिंबा देणाऱ्या बारणेंना विजयी करा – प्रशांत ठाकूर
प्रतिनिधी पनवेल, १२ एप्रिल २०२४ स्वतःच्या खासदारकीची पर्वा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने तिसऱ्यांदा संसदेत निवडून पाठवूयात, असा निर्धार पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केला.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल येथे महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार रामशेठ ठाकूर होते.
व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार खासदार बारणे, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख महादेव पाटील, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, कवाडे गटाचे सीताराम कांबळे तसेच अरुण भगत, परेश पाटील, परेश ठाकूर, अनिल भगत, प्रथमेश सोमण, प्रवीण पाटील, रुपेश ठोंबरे, शिवदास कांबळे, प्रज्ञा चव्हाण, प्रभाकर कांबळे, महेश जाधव, दर्शन ठाकूर, सुनील नाईक, चारुशीला घरत, मंगेश नेरूळकर, सुनील मोहोळ, अमोल इंगोले, रवींद्र जोशी, कुंदाताई गोळे, रवीनाथ पाटील आदींसह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालीच देशाचा विकास होईल. ‘सब का साथ, सब का विकास,’ या मोदींच्या घोषणेवर विश्वास ठेवून खासदार बारणे यांनी ठाम भूमिका घेतली. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार याची संपूर्ण जगाला खात्री आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेली कामे सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवा आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य चिंचवडपेक्षा एका मताने तरी जास्त असले पाहिजे.
पनवेलमध्ये सव्वा लाख मताधिक्याचे लक्ष्य
पनवेल विधानसभा मतदारसंघातील बारणे यांचे मताधिक्य सव्वा लाखाच्या वर जाण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून काम करावे, असे आवाहन रामशेठ ठाकूर यांनी केले. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे मनोमीलन झाले आहे. बारणे यांच्या रूपाने आपल्याला पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत. खासदार बारणे यांचे काम बोलके आहे. आपले नाणे खणखणीत आहे. त्यामुळे आपले निशाणी ‘धनुष्यबाण’ घरोघर पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी अभिमानाने करावे, असेही ते म्हणाले.
खासदार बारणे म्हणाले की, जगात भारताची मान उंचावणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मावळच्या जनतेमुळे मला मिळाली आहे. रायगडच्या जनतेने मला खूप प्रेम दिले आहे. त्यामुळे कोणताही राजकीय दृष्टिकोन न ठेवता मी कामाचा ठसा उमटवू शकलो. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे आम्हाला अडीच वर्षे बाजूला राहावे लागले, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार असणारी शिवसेना पुढे नेण्याचा निर्णय आपण घेतला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती देखील महायुती सहभागी झाल्यामुळे मोठी ताकद निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता मताधिक्य वाढवून पंतप्रधान मोदींचे हात अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आव्हान बारणे यांनी केले.
‘तिसरी बार, बारणे खासदार’
‘अब की बार चार सौ पार’ आणि ‘फिर एक बार मोदी सरकार’ या घोषणांबरोबरच ‘तिसरी बार, बारणे खासदार’ हे नवी घोषणा बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिली. समन्वयाच्या धोरणामुळे युद्धामध्ये व निवडणुकांमध्ये हे यश मिळते, हा इतिहास आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय शेवटपर्यंत राहणे आवश्यक आहे, अशी सूचना त्यांनी केली. भ्रष्टाचाराची दुकाने पूर्ण बंद करण्यासाठी, समान नागरी कायदा आणण्यासाठी, पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना 400 पेक्षा अधिक खासदारांची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.
एमपीएससीच्या फौजदार परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या जितेंद्र पंढरीनाथ सोनवणे यांचा यावेळी खासदार बारणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
शिवदास कांबळे, नरेंद्र गायकवाड, परेश पाटील, अमोल इंगोले, प्रज्ञा चव्हाण, सीताराम कांबळे आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. रामदास शेवाळे यांनी प्रास्ताविक केले तर नितीन पाटील यांनी आभार मानले. प्रवीण मोहकर यांनी सूत्रसंचालन केले.