अभिवादनपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

भारतीय स्त्रीयांचे प्रथम विद्यापीठ “ज्ञानजोती सावित्रीबाई फुले” यांच्या स्मृतिदिना निमित्त बालाजी नगर मधे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन..

प्रतिनीधी पिंपरी चिंचवड दि. ११ मार्च २०२६ काल सायंकाळी बूद्ध विहार बालाजीनगर भोसरी येथे, क्रांतीज्योती, ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या १२९ व्या स्मृती दिनानिमित्त, सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य, यांचे माध्यमातून त्यांच्या विचारांना व आचारांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी या संघटनेच्या अध्यक्षपदी सदरील ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्या आयु. संगीताताई कसबे होत्या. हा अभिवादन कार्यक्रम
सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, या सामाजिक संघटनेच्या, पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या
अध्यक्षा आयु. हिना फिरोज तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला होता.
या प्रसंगी बुद्ध मुर्तीस पुष वाहुन तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महिलांनी व पुरुष पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून, त्रीशरण पंचशील, ग्रहण केले.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त बाम सेफ तसेच मुलं निवासी संघाचे आयु. धावटे गुरुजी यांनी व बाळासाहेब कोंडिराम शिंदे, आयु. सावित्रीबाई शिंदे, आयु. संगीताताई कसबे यांनी, शहर अध्यक्षा हिना फिरोज तांबोळी, व या सामाजिक संघटनेचे संस्थापक भिमरत्न प्रा. बी. बी. शिंदे. यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पूष्प वाहून अभिवादन केले. या वेळी प्रा. बी. बी. शिंदे. यांनी आपले विचार मांडताना बोलले की माता सावित्रीबाई फुले या केवळ स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत नव्हत्या, तर त्या सामाजिक समतेच्या विचारांच्या प्रखर पुरस्कर्त्या होत्या. शिक्षण हेच शोषित-पिडीत समाजाच्या मुक्तीचे प्रभावी साधन आहे, ही त्यांची ठाम धारणा होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी इंग्रजी शिक्षणाच्या महत्त्वाकडे समाजाचे लक्ष वेधले.
जगातील सर्व भाषा महत्त्वाच्या आहेत. कारण त्या मानवी संवादाचे माध्यम असतात. आपल्या मातृभाषेला मराठीला आपण निश्चितच मान देतो. मातृभाषेतून कोणताही विषय लवकर समजतो, हेही वास्तव आहे. परंतु जागतिक व्यवहारासाठी इंग्रजीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज काही लोक इंग्रजी भाषेला कमी लेखतात; पण स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण देतात आणि इतरांना मराठी माध्यमाचा आग्रह करतात. ही विसंगती लक्षात घेण्यासारखी आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी “इंग्रजी माऊली” ही अत्यंत अर्थपूर्ण कविता लिहिली होती. त्यात त्या लिहितात –
“इंग्रजी माऊली ! इंग्रजी वैखरी
शूद्रांना उद्धारी ! मनोभावे !!”

या कवितेत त्यांनी इंग्रजी भाषेला “माऊली” म्हणजे आईचे स्थान दिले आहे. कारण त्यांच्या मते इंग्रजी शिक्षण हे शूद्र-अतिशूद्र आणि स्त्रियांना अज्ञानाच्या अंधःकारातून बाहेर काढणारे आणि सत्यज्ञान देणारे होते. त्या पुढे म्हणतात –
इंग्रजी माऊली ! नाही मोगलाई
नाही मूर्खशाही !!

यामध्ये त्यांनी त्या काळातील अन्यायी सामाजिक-राजकीय व्यवस्थेचा निषेध केला आहे. आपल्या देशात काही काळात शूद्र-अतिशूद्रांना शिक्षणापासून दूर ठेवले गेले होते. अशा परिस्थितीत इंग्रजी शिक्षणामुळे शोषित समाजाला ज्ञान, आत्मसन्मान आणि मनुष्यत्व मिळू शकते, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
सावित्रीबाईंच्या या कवितेचा संदेश स्पष्ट आहे –
शिक्षण हेच उद्धाराचे साधन आहे. शिक्षणामुळेच समता, आत्मसन्मान आणि मानवतेची जाणीव निर्माण होते. इतिहासात पाहिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही लहानपणी इंग्रजी शिक्षणाची भक्कम पायाभरणी त्यांच्या वडिलांकडून झाली. पुढे त्यांनी जगातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले आणि इंग्रजी भाषेच्या माध्यमातून जगभर आपल्या विचारांचा प्रभाव पाडला.
आजच्या काळात इंग्रजीचे महत्त्व आणखी वाढले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण, जागतिक व्यापार, इंटरनेट आणि आंतरराष्ट्रीय संवाद या सर्व क्षेत्रांमध्ये इंग्रजी ही प्रमुख भाषा आहे. जगात कुठेही गेलो तरी संवादासाठी इंग्रजी उपयुक्त ठरते.
इतिहासात ब्रिटिशांच्या काळात १८३५ मध्ये इंग्रजी शिक्षण धोरण लागू झाले. त्यानंतर इंग्रजी भाषा प्रशासन, शिक्षण आणि न्यायव्यवस्थेची प्रमुख भाषा बनली. परिणामी भारतीयांना पाश्चात्य साहित्य, विज्ञान आणि विचारधारा समजण्याची संधी मिळाली.
महात्मा जोतिबा फुले यांनाही थॉमस पेन यांच्या “The Rights of Man” या ग्रंथाचा प्रभाव पडला होता. त्यातूनच मानवी हक्क आणि सामाजिक न्याय याविषयीच्या त्यांच्या विचारांना अधिक बळ मिळाले. हे सर्व इंग्रजी भाषेच्या माध्यमातून शक्य झाले.
तरीही, इंग्रजीचे महत्त्व मान्य करताना आपल्या मातृभाषेचा विसर पडता कामा नये. मराठी ही अत्यंत समृद्ध भाषा आहे. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान, संत तुकारामांचे अभंग, संत एकनाथांचे भारूड या साहित्यसंपदेने मराठीला वैश्विक उंची दिली आहे.
म्हणूनच योग्य मार्ग म्हणजे मातृभाषा आणि इंग्रजी यांचा समतोल साधणे.
घरात, संस्कृतीत आणि भावना व्यक्त करताना मराठीचा सन्मान राखावा, तर ज्ञान, विज्ञान आणि जागतिक संवादासाठी इंग्रजीचा स्वीकार करावा.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची “इंग्रजी माऊली” ही कविता केवळ भाषेचे स्तोत्र नाही, तर शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडविण्याचा संदेश देणारे घोषणापत्र आहे.
आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण एवढेच म्हणू शकतो शिक्षण, समता आणि मानवतेचा जो दीप त्यांनी पेटवला, तो सदैव प्रज्वलित ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे. स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि मानवमुक्तीच्या महान कार्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. प्लेगच्या साथीत एका रुग्णाला आपल्या पाठीवरून नेत असताना त्यांना स्वतःला प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. मानवसेवेच्या या महान कार्यासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली. अशा या महान समाजक्रांतिकारकांना आज त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!