विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार:- प्रदीप जांभळे पाटील
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १५ जुलै २०२४ महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा अधिक वृद्धिंगत करण्यासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केले.
उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे सुमारे दोन महिन्याच्या कालावधीनंतर आज शाळेची घंटा निनादली. महापालिकेच्या वतीने शाळेचा पहिला दिवस “प्रवेशोत्सव” म्हणुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाकड येथील कन्या शाळा आणि थेरगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापिका नीलिमा कुटे, श्यामला शिंदे, मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांच्यासह शाळेतील शिक्षक,पर्यवेक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जांभळे पाटील म्हणाले, महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक गुणवत्ता आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. हा आलेख अधिक वाढविण्याकरिता सर्व शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते सोबत विद्यार्थ्यांच्या कला, क्रिडा, विज्ञान आणि इतर कौशल्यांना वाव देण्यासाठी महापालिकेच्या वतीने अनेकविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विविध शिष्यवृत्ती परीक्षा राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्याबाबत सजग राहावे आणि त्याचा ऊपयोग करून घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना अधिक वाव देण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले.
महापालिकेच्या शाळांमधील स्वच्छता ही कौतुकास्पद बाब आहे. येत्या १५ जुलै पर्यंत महापालिकेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, आज महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले .
थेरगाव, वाकड येथील शाळांमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्प, गणवेश आणि पाठ्यपुस्तकं देऊन स्वागत करण्यात आले. येत्या वर्षी विद्यार्थ्यांचा गणवेश बदलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.