तीन वर्षांनंतरही MIDCच्या निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती नाही!

MIDC सरळसेवा भरती २०२३: सहाय्यक आरेखक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
“सरकारमधील अधिकारी व पुढारी टक्केवारीची वाट बघत आहेत का?”- सुनिल गव्हाणे
प्रतिनिधी मुंबई दि. २२ ऑगस्ट २०२६ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत सहाय्यक आरेखक (Assistant Draftsman) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. भरती प्रक्रियेला जवळपास तीन वर्षे उलटूनही हा प्रश्न प्रलंबित राहणे अत्यंत गंभीर आहे.
१३ ऑगस्ट २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर १० ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी गुणवत्ता यादी, १० फेब्रुवारी २०२६ रोजी निवड यादी आणि ६ मे २०२६ रोजी कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली. तरीही निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
एकीकडे भाजप सरकार आणि उद्योगमंत्री महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीच्या मोठमोठ्या घोषणा करतात; मात्र दुसरीकडे निवड झालेल्या तरुणांना नियुक्ती आदेश देण्यातही सरकार अपयशी ठरत आहे. सरकार आणि उद्योग विभागाची ही निष्क्रियता निषेधार्ह आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश समन्वयक (फ्रंटल व सर्व सेल) सुनिल गव्हाणे यांचा सवाल
«“उमेदवारांनी परीक्षा दिली, गुणवत्ता यादीत स्थान मिळवले, निवड झाली आणि कागदपत्र पडताळणीही पूर्ण झाली. मग नियुक्ती आदेशासाठी एवढा विलंब का? सरकारमधील अधिकारी व पुढारी टक्केवारीची वाट बघत आहेत का?
युवकांच्या रोजगारापेक्षा टक्केवारी, गुंडगिरी आणि भ्रष्टाचारालाच प्राधान्य दिले जात आहे का?”»
निवड झालेल्या सर्व उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश द्यावेत आणि विलंबाचे कारण सरकारने स्पष्ट करावे. अन्यथा या प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.



