वैद्यकीय सेवेत महाराष्ट्र राज्यात पिंपरी चिंचवड महापालिका दुसऱ्या क्रमांकावर..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड २७ जुलै २०२४ महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्तम दर्जाच्या सेवा सुविधांमुळे वैद्यकीय सेवेत महाराष्ट्र राज्यात पिंपरी चिंचवड महापालिका दुसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल आयुक्त शेखर सिंह यांनी वैद्यकीय विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ही बाब उल्लेखनीय असून नागरिकांना देण्यात येणाऱ्या दर्जेदार सेवांमध्ये वैद्यकीय विभागाने तप्तर राहून हा क्रम अग्रस्थानी न्यावा, असेही आयुक्त शेखर सिंह म्हणाले.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या वतीने राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आरोग्य कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात बालक, कुटुंब नियोजन, डेंग्यू, एचआयव्ही आणि इतर आजारांबाबतचे कार्यक्रम राबविणे, महापालिकेकडून वैद्यकीय सेवेसाठी करण्यात येणारा वित्त पुरवठा तसेच रूग्णालये व दवाखान्यात रूग्णांवर करण्यात येणारे उपचार सेवा आदी निर्देशांकानुसार वर्गीकरण करून गुण देण्यात आले आहेत. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दुसरे स्थान मिळवले आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून नागरिकांना चांगल्या दर्जाची उपचार सेवा दिल्या जात आहेत. तसेच, केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य कार्यक्रमांची उत्तम प्रकारे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सर्वाधिक गुण मिळवित राज्यात दुसरे स्थान प्राप्त केले आहे.
कोट
शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी महापालिकेच्या काही रूग्णालये सुरू केली आहेत. तेथे उत्तम दर्जाच्या सुविधा माफक दरात देण्यासाठी महापालिकेचे डॉक्टर व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. त्या सेवा- सुविधेत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येत आहे. महापालिका रूग्णालयांतील सेवेमुळे रूग्ण तसेच, नागरिक समाधानी असल्याचे चित्र आहे असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी यावेळी सांगीतले.