भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रशिक्षकांनी खेळातील जुन्या आठवणींना दिला उजाळा..
प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. ०१ ऑगस्ट २०२४ पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीच्या ५० मिटर प्रकारात कांस्य पदक पटकविणारा स्वप्निल कुसळे हा सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी स्कूल आणि कॉलेजचा रामदंडी आहे. भारतासाठी पदक मिळवून देणाऱ्या स्वप्निलच्या या यशाने “भोसला” च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून भोसला आणि पदक विजेत्या खेळाडूंची यशस्वी परपंरा दर्शवणारे हे नाते कायम असल्याचे दिसते. या यशामुळे संस्था आणि संपूर्ण कॅम्पसच्यावतीने स्वप्निलचे अभिनंदन केले आहे, यानिमित्ताने पदाधिकारी, क्रीडाशिक्षकांनी जुन्या काळातील आठवणींना सुध्दा उजाळा दिला आहे.
सैनिकी शिक्षणासाठी देशात परिचित असलेली सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोसला मिलिटरी स्कूल, कॉलेज हे दर्जेदार, नावाजलेले खेळाडू घडविणारी संस्था म्हणून परिचित आहे. यापुर्वीच्या शासनाच्या क्रीडाप्रबोधीनी आणि कॅम्पसमध्ये असणाऱ्या खेलो इंडियाद्वारे अनेक नामांकित खेळाडू संस्थेने देशाला दिले आहे, त्यात अर्जुन पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, संजीवनी जाधव, किसन तडवी, ताई बामणे, मोनिका आथरे, कोमल जगदाळे यासारख्या धावपटूंचा उल्लेख करता येईल.
स्वप्निलचे यशही इतरांसाठी प्रेरणादायी..
स्वप्निलने भोसला मिलिटरी स्कूलमध्ये असणाऱ्या नेमबाजीच्या क्रीडाप्रबोधीनीद्वारे तत्कालीन राज्य प्रशिक्षक नानासाहेब देशमुख यांच्याकडे आपल्या खेळाला सुरवात केली. इयत्ता नववी, दहावीचे ( सन २००९ ते २०११) त्याचे शिक्षण हे स्कूलमध्ये झाले. त्यानंतर पुढे ११ वी ते प्रदवीचे प्रथम वर्षे वाणिज्य शाखेचे (सन २०११ ते २०१४) शिक्षण हे त्याने भोसला मिलिटरी कॉलेजमधून घेतले. आपल्या या शैक्षणिक काळात त्याने नेमबाजीचा खेळ सुरुच ठेवला. संस्थेच्या खेलो इंडिया उपक्रमाचा देखील त्याला फायदा झाला. नियमित सराव व तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे त्याला हे यश संपादन करता आले. संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, सरकार्यवाह सी.एम.ए. हेमंत देशपांडे, नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय पगारे, कार्यवाह मिलिंद वैद्य आदीं पदाधिकाऱ्यांनी स्वप्निलच्या या य़शाबद्दल अभिनंदन करत आनंद भावना व्यक्त केली नियमित सराव, कष्ट करण्याची तयारी आणि योग्य मार्गदर्शनामुळेच त्याला हे यश संपादन करता आले. तो आमच्या संस्थेचा रामदंडी असल्याने तसेच त्याने भारतासाठी पदकाची कमाई करून उल्लेखनिय कामगिरी केली आहे. याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो, भोसला कॅम्पस ही खेळाडूंची खाण असून त्याचे हे यश आमच्या इतर उदयोन्मुख खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.