कोपरगावात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने सोमवार १२ जून रोजी भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन..

प्रतिनिधी- अजय विघे नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय श्रावण भालेराव या भीमसैनिकाची निर्घून हत्या त्या गावातील काही गाव गुंडांनी केली या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी कोपरगाव शहरासह तालुक्यातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन सोमवार दिनांक १२ जून २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे तेव्हा शहरासह तालुक्यातील सर्व भीमसैनिक उपासक उपासिकांनी जास्तीत जास्त संख्येने या भव्य जन आक्रोश मोर्चासाठी उपस्थित राहावे.
असे आवाहन सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे याबाबत आज गुरुवार दिनांक ८ जून २०२३ रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मोर्चा संदर्भात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने पत्र देण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड दक्षिण तालुक्यातील बोंढार हवेली या गावात गेले.
कित्येक वर्षापासून महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन रॅली निघाली नव्हती कारण त्या गावातील जातीयवादी मानसिकता असलेल्या प्रस्थापितांनी गावात जयंती कधी करू दिली नाही.
परंतु यावर्षी बोंढार हवेली या गावातील तरुण भीमसैनिकांनी स्थानिक ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार अशोक घोरबांड यांना संविधानिक मार्गाने रीतसर परवानगी घेऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली मात्र गावातील गाव गुंडांना हे सहन झाले नाही.
त्यांनी या घटनेची सल मनात ठेवून त्या गावातील नारायण विश्वनाथ तिडके यांच्या लग्नाची वरात सायंकाळी काढली होती.
त्यावेळी तेथील ९ गावगुंड हातात तलवार खंजर लाठ्या काठ्या घेऊन गावात भीम जयंती काढता का ? असे मोठ मोठ्याने म्हणत जातीवरून शिव्या देऊन “यांना तर जीवच मारले पाहिजे” असे ओरडून सायंकाळी साधारण ०७.३० वाजण्याची वेळ असावी तेव्हा हा प्रकार घडला त्यानंतर गावातील गावगुंड कृष्णा गोविंद तिडके निळकंठ रमेश तिडके नारायण विश्वनाथ तिडके शिवाजी दिगंबर तिडके यांनी अक्षय भालेराव यास लाटया काठ्यांनी व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून खंजरने पोटात सपासप वार करत असतांना अक्षयचा भाऊ आकाश अक्षयला सोडवण्यासाठी मध्ये गेला असता आकाशला सुद्धा दत्ता विश्वनाथ तिडके यांने त्याच्या हातातील खंजीरणे डाव्या खांद्यावर वार करून लाथा बुक्क्यांनी आकाशला देखील मारहाण केली.
या घडलेल्या घटनेतील ८ आरोपींना पोलिसांनी गजाआड केले असून १ आरोपी अद्यापही फरार आहे त्याचाही लवकरात लवकर शोध घेऊन त्यालाही जेरबंद करावे व सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी.
यासाठी कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने कोपरगाव येथे सोमवार दिनांक १२ जून २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून सदरचा मोर्चा हा महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून निघून तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तेव्हा कोपरगाव शहरासह तालुक्यातील सर्व भीमसैनिकांनी उपासक व उपासिकांनी गट तट पक्ष संघटना बाजूला ठेवून निळ्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र येऊन घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करुन आपली शक्ती दाखवून देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.




