
गावाचा शाप आणि आईचं मातृत्व – लवकरच प्रेक्षकांसमोर एक हृदयस्पर्शी भयकथा!
प्रतिनिधी सतिश वि. पाटील मुलुंड दि. ०६ सप्टेंबर २०२५ “बालकला म्हणजे कल्पनाशक्ती, आणि ती पडद्यावर उतरली तर काय जादू घडते याचा प्रत्यय प्रेक्षकांना लवकरच येणार आहे.” मुलुंडमधील नामांकित नाट्यालंकार संस्था यांच्याकडून घडवलेला एक आगळावेगळा प्रयोग म्हणजे भयपट ‘पहिलं मूल’. हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर असून, स्थानिक कलावंत आणि बालकलाकारांनी मिळून तयार केलेली ही निर्मिती महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे.
कलावंतांचा भक्कम ताफा
या भयपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत- विनय गोरेगावकर, गौरागी शेवड़े, स्नेहल काळे, ज्येष्ठ कलाकार जयराज नायर, संजीवनी जाधव, तसेच कणकवलीचे गुणी कलाकार विजय चव्हाण या सोबतच, नाट्यालंकार संस्थेचे अनेक बालकलाकार या सिनेमात झळकणार असून, हेच बालकलाकार आज मालिकांमध्ये व इतर चित्रपटांतही लोकप्रिय झालेले आहेत.
बालकलाकारांची दमदार उपस्थिती
‘पहिलं मूल’ या भयपटात विशेष लक्ष वेधून घेतील असे बालकलाकार म्हणजे-
निया पवार (अशोक मामा), अथर्व मोटे (धर्मवीर 2), तनिष हडवळे (आदानी जाहिरात) यांच्यासह आणखी अनेक बालकलाकारांनी आपल्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्जता दाखवली आहे.
कथा – गावाचा शाप आणि मातृत्वाची ताकद
हा चित्रपट एका गावाच्या शापावर आधारित आहे. अंधश्रद्धा, भय आणि काळोख यामध्ये गुंतलेली ही कथा फक्त भीती निर्माण करत नाही, तर आईच्या मातृत्वाची महत्ताही अधोरेखित करते. भयपटाच्या चौकटीत उलगडलेली ही हृदयस्पर्शी भावकथा प्रेक्षकांना थरारासह एक नवी जाणीव देईल.
दिग्दर्शकाची दृष्टी
या चित्रपटाचं दिग्दर्शन नाट्यालंकार संस्थेचे अलंकार मिसाळ यांनी केलं आहे. मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ देत, त्यांची क्षमता मोठ्या पडद्यावर सिद्ध करण्याच्या ध्येयाने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. मिसाळ यांनी या आधीही विविध नाट्यप्रयोगांतून बालकलाकारांना संधी दिली असून, ‘पहिलं मूल’ हा त्यांचा सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रयत्न मानला जातो.
अपेक्षा आणि उत्सुकता
‘पहिलं मूल’ या भयपटाबाबत आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. स्थानिक कलावंतांची मेहनत, बालकलाकारांची कल्पनाशक्ती आणि ज्येष्ठ कलाकारांचा अनुभव या सगळ्यांचा संगम या सिनेमात घडत आहे. त्यामुळे हा चित्रपट फक्त भयपट म्हणून नव्हे, तर सामूहिक कलात्मकतेचं प्रतीक म्हणूनही लक्षात राहील.





