आंदोलनपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

सत्ता टिकवण्यासाठी रात्रंदिवस रणनीती आखली जाते; पण विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी तितकीच तातडी का दिसत नाही? : सुनिल गव्हाणे

टी.ई.टी पेपरफुटी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी संघटने कडून तीव्र निषेध..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ जून २०२६ राज्यात पुन्हा एकदा टी. ई.टी. परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, स्वप्नांची आणि भविष्याची अक्षरश: थट्टा होत आहे. या गंभीर प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी संघटने कडून प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
गेल्या काही वर्षांत नीट, एमपीएससी, शिक्षक भरती, विविध स्पर्धा परीक्षा आणि आता TET अशा अनेक परीक्षांभोवती निर्माण झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा
शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासच डळमळीत झाला आहे. ही केवळ प्रशासकीय चूक नसून राज्य सरकारच्या निष्क्रियतेचे आणि अपयशाचे जिवंत उदाहरण आहे.
एकीकडे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे केंद्र व राज्यातील सरकार विरोधी पक्षांचे खासदार-आमदार फोडण्यात, सत्ता टिकविण्यात आणि राजकीय समीकरणे बदलण्यात व्यस्त आहेत; मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पार पाडण्यात ते वारंवार अपयशी ठरत आहेत.
राजकीय सत्तेसाठी सर्व यंत्रणा वेगाने काम करताना दिसतात, पण परीक्षा सुरक्षित ठेवणे, पेपरफुटी रोखणे आणि दोषींवर तातडीने कारवाई करणे याबाबत मात्र संपूर्ण निष्क्रियता दिसून येते. ही परिस्थिती अत्यंत संतापजनक आहे.
विद्यार्थी आणि पालक वर्षानुवर्षे प्रचंड मेहनत करतात, लाखो रुपये खर्च करून तयारी करतात; पण प्रत्येक वेळी पेपरफुटीमुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाते. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी आमची ठाम मागणी आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांना स्पष्ट उत्तर द्यावे. फक्त चौकशीच्या घोषणा करून वेळकाढूपणा न करता दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी.
प्रमुख मागण्या:

– टी.ई.टी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी.

– पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या संपूर्ण रॅकेटवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटले चालवावेत.

– विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पुढील निर्णय जाहीर करावेत.

– राज्यातील सर्व भरती व स्पर्धा परीक्षांसाठी सुरक्षित, तंत्रज्ञानाधारित आणि उत्तरदायी परीक्षा प्रणाली तातडीने लागू करावी.

– शिक्षणमंत्री यांनी या वारंवार घडणाऱ्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.


असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी या निवेदनाद्वारे सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!