अभिवादनउत्सवदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशुभेच्छासामाजिक

आषाढी वारीला पंढरपूरात  रेकॉर्ड ब्रेक गर्दी २७ /२८ लाख भाविकांची नोंद !

प्रतिनीधी सतिश वि. पाटील मुंबई दि. ०८ जूलै २०२५ यंदाची आषाढी वारी विक्रमी होती, याचा पुरावा आता थेट यावर्षी वापरलेल्या एआय तंत्रज्ञानाने दिला आहे. आषाढी एकादशी दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ या कालावधीत तब्बल २७ ते २८ लाख भाविकांचा हेड काउंट नोंद झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. यावर्षी आषाढी एकादशीला मुंगीलाही पाय ठेवायला जागा नव्हती. जिकडे पाहावे, तिकडे फक्त भाविकांचा महासागर लोटल्याचे चित्र होते. आजवरचे आषाढी वारीच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडले गेले आहेत असे पोलिस अधीक्षकांनी यावेळी सांगीतले.
यंदा पहिल्यांदाच वापरलेल्या एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडण्यात आलेल्या ड्रोनने या भाविकांची मोजणी केली आणि हा आकडा २७ ते २८ लाख इतका मिळून आला. प्रशासनाने एकाच वेळेला चंद्रभागेकडे येणारा मार्ग दर्शन रांग मंदिर परिसर अशा ६ विभागात ड्रोन सोडून ही माहिती संकलित केली आहे. आषाढीसाठी ५० हजारांपेक्षा जास्त ट्रक, टेम्पो, कार आणि विविध खाजगी वाहने यांची नोंद झाली आहेत. याशिवाय जवळपास ६ हजार एसटी बसेस आणि १०० रेल्वे फेर्‍यातून प्रवासी आले होते.
विशेष म्हणजे द्वादशीला सकाळच्या ६ तासात ९५ टक्के वाहने आणि भाविक परतल्याने आता पंढरपूर मोकळे झाले आहे. वाहतूक नियोजनासाठी आज पहाटेपासून शहराबाहेर पडणार्‍या सर्व ६ मार्गांवर ६ डीवायएसपी दर्जाचे अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. त्यामुळे लाखो भाविकांना दुपारपर्यंत बाहेर जाताना कोठेही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले नाही. यालाही एआय तंत्रज्ञानाची मदत उपयोगी पडल्याने योग्य नियोजन झाल्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
आषाढी यात्रेसाठी पंढरीत दरवर्षी लाखो भाविक येतात. पालखी सोहळ्यात वारकर्‍यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. शेकडो दिंड्या, वारकरी सहभागी झालेले असतात. यंदा वारक-यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटकासह इतर राज्यांतून भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यंदाची गर्दी विक्रमी ठरली आहे. एआयच्या मदतीने पंढरीत आषाढी यात्रेदिनी हेड काऊंट केले. त्यात ही संख्या २८ लाखांपर्यंत दाखविल्याचे सांगण्यात आले.
सुखरूप पार पडली यात्रा
आषाढी एकादशीला यंदा भाविकांची प्रचंड गर्दी होती. गर्दीचा अंदाज घेऊन वाहतुकीचे नियोजन केले होते. यात एकेरी वाहतूक केल्याने मंदिर परिसर प्रदक्षिणामार्ग आणि वाळवंट यापैकी कोठेही चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या नाहीत. संपूर्ण यात्रा कालावधीत कोणतीही दुर्घटना झाली नसल्याचे सांगितले गेले.
१८० चोरटे ताब्यात
एकादशी दिवशी जवळपास २७०० चुकलेल्या भाविकांना पुन्हा त्यांच्या जवळच्या माणसांमध्ये सोडण्यात आले. गर्दीचा फायदा घेऊन चोर्‍या करणार्‍या जवळपास १८० चोरांना पोलिसांच्या माऊली पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. यामुळे चोरट्यांचे सर्व प्लॅनही फसले असल्याचे दिसते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!