
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २२ एप्रिल २०२६ सांगवी पोलीस स्टेशनकडून अंमली पदार्थांविरोधात प्रभावी आणि धडक कारवाई करत मोठे यश संपादन करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपनिरीक्षक महादेव भालेराव यांच्या नेतृत्वात ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पाटेठाण, ता. दौंड परिसरात मोठ्या प्रमाणात गांज्याची साठवण व वाहतूक होत असल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली होती. या माहितीची पडताळणी करून सांगवी पोलीस स्टेशनच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला व संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छापेमारीदरम्यान संशयितांकडील मालाची तपासणी केली असता सुमारे ७० किलो गांजा जप्त करण्यात आला. सदर जप्त मालाची अंदाजे बाजारभावानुसार किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात वापरण्यात आलेली वाहने तसेच इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले असून अंमली पदार्थ पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे. या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधार, पुरवठादार व इतर सहकारी यांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव भालेराव यांच्यासह जीपीएसआय हिंगे साहेब, एएसआय निशांत काळे, एएसआय वाघुळे, हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, हेड कॉन्स्टेबल धावले यांनी सक्रिय सहभाग घेतला व उत्कृष्ट कामगिरी बजावली.
या यशस्वी कारवाईमुळे अंमली पदार्थांविरोधात कडक संदेश गेला असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे. सांगवी पोलीसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या परिसरात अंमली पदार्थांविषयी कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे.
“पाटेठाण, ता. दौंड येथे केलेल्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या जाळ्यावर मोठा प्रहार झाला आहे. सांगवी पोलीसांचे हे पाऊल समाजहिताचे असून युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या या कारवाई करिता युवासेना, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष ( मावळ लोकसभा ) मेघराज प्रिया सिद्धार्थ लोखंडे यांच्या वतिने संबंधित पथकाचे आभार मानन्यात आले.



