उत्सवमहाराष्ट्रविशेषसामाजिक

पुन्हा एकदा पेटवा चळवळीच्या मशाली मी येतोय.. साथ द्या मला- विद्रोही कवी नितीन चंदनशिवे

विशेष प्रतिनिधी कवठेमहांकाळ दि. २७ एप्रिल २०२५ एक एप्रिल पासून माझा प्रवास सुरू आहे. वामनदादाने वाजवलेली सुरपेटी आणि त्यांनी पेरलेल्या आंबेडकरी चळवळीचा शोध घेत मी फिरतो आहे. पण आजच्या या डिजे वर नाचणाऱ्या तरुणाईला वामनदादादा आणि त्यांचा त्याग माहीत नाही. विचारांची आणि सांस्कृतिक चळवळ रुजवू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना सध्या खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे…
अरे नाचून नाही तर वाचून जयंती साजरी करा असे म्हणणाऱ्या लोकांना इथले काही लोक उत्तर देताना असे म्हणतात की, आम्ही वर्षभर वाचत असतो एकच दिवस नाचतो.. मी खरं सांगू वर्षभर तुम्ही काहीच वाचत नाहीत.. जर तुम्ही वर्षभर वाचत असता तर आजच्या परिस्थिती मध्ये नाचलाच नसता… आणि हो आज आमच्या तोंडावर कुणीतरी थुंकून जावं असा प्रश्न विचारलाच नसता…? तो प्रश्न म्हणजे कोण नामदेव ढसाळ..?
यावर्षी मला हे ही जाणवत आहे की, जी क्रेझ असते जयंतीची ती यावर्षी कमी आहे. त्याचं कारण शोधून बघितल्यावर लक्षात आलं की यावर्षी आपल्याकडे निवडनूका नाहीत…याचा अर्थ डीजे आणि बॅनर साठी पैसा देणारा उमेदवार गल्लीत आलेलाच नाही?…
जे शिकून नोकरीला लागलेले आहेत त्यांनी जवळच्या शहरात फ्लॅट घेतले आहेत. ते लोक नटून थटून रुबाबात असलेल्या आपल्या बायकोसोबत आपल्याच चारचाकी गाडीत बसून शहराच्या ठिकाणी असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ येऊन सेल्फी काढत आहेत.. गाडीवर बाबासाहेबांची सही आहे… आणि काढलेला सेल्फी स्टेट्स वर टाकून ते आम्ही किती ग्रेट आहोत हे दाखवू लागले आहेत…
ज्या बायका रानात कामाला जातात कुणाच्या तरी घरी धुणी भांडी करायला जातात त्या महिला मात्र जाणीव ठेवून बाबासाहेब जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत..
कुठलीही मिरवणूक न निघता, कुठलाही डीजे न वाजवता आज नको असलेले लोक आपल्या गल्लीपर्यंत पोहचले आहेत…कारण त्यांनी त्यांची सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळ जोमाने सुरू ठेवली आहे..
हागणदारीतल्या दगडाशी कोहनुर हिरा तोलू नये.
ज्यांचा बाप खरा नाही त्यांनी जय भीम पण बोलू नये.
या ओळी लिहिणारा सिद्धार्थ तांबे सारखा कवी या पिढीला माहीत झालेला नाही.. ही आमची फार मोठी लढाई आम्ही हारलो आहोत..
आमदार खासदार यांच्या आशीर्वादाने आमचं बौद्ध विहार झालेलं आहे. पण त्या विहारात आमच्या समाजाच्या प्रगतीसाठी काही ठेवलेलं नाही… ही बाब आमच्या लक्षात आलेली नाही……
मी वक्ता म्हणून जायचं… गर्दी नसतेच… जुन्या काळातील पँथरचा काळ अनुभवलेली माणसं मात्र आवर्जून उपस्थित असतात… पण ज्यांच्यापर्यंत चळवळ न्यावी वाटते ते तरुण कार्यक्रमाला येत नाही… मग मीच प्रमुख पाहुण्याचा थाट उतरवून टाकायचा…आणि कार्यकर्त्यांना घेऊन गल्लीत घुसायचे…मग सगळ्यांना गोळा करून आणायचे… सगळे आलेच तर ते समोर बसत नाहीत.. तरुण पोरं लांबच उभी राहतात हातात मोबाईल घेऊन… मग मीच माहोल तयार करायचा…सगळ्यांना जवळ बोलावून घ्यायचं… वास्तव मांडत रहायच… आणि कार्यक्रम संपला की मग सगळ्या लोकांना हात जोडून धन्यवाद द्यायचे… भाषण संपल की मग पोरं सेल्फी काढायला गर्दी करतात…अत्यंत अल्प मानधन घेऊन मी एखाद्या कार्यकर्त्याच्या घरीच झोपायचं… तिथून सकाळी लवकर उठायचं… दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या गावात मला बोलावणे आलेलेच असते… मग तिथल्या कार्यकर्त्याला फोन करायचा… माहिती घ्यायची… आणि एसटीने प्रवास करत तिथे पोहचायचं… तिथ ही परिस्थिती अशीच… मग तिथं पुन्हा शून्यातून सुरवात करायची आणि आंबेडकर पेरत रहायच…
इथले प्रस्थापित आणि इथले ढोंगी पुरोगामी आम्हाला बोलावत नाहीत.. बोलावलं तर अरे हा तर दलीत म्हणून अपमान करतात… आणि इकडे आमचेच अरे हा तर आपलाच म्हणून आमचा अपमान करतात… तरीही ते भोगत रहायच… कारण मला माहीत आहे आज जर ही लढाई आपण लढलो नाही तर येणारा काळ भयंकर आहे… आज कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न विचारणारी इथली व्यवस्था एक दिवस इतकी मोठी होईल आणि आम्हाला प्रश्न विचारेल की कोण. आंबेडकर??? याची भीती वाटत राहते म्हणून हा प्रपंच..
या पाच सहा वर्षात आमचा स्पर्धा परीक्षेतील लागणारा निकाल त्याची टक्केवारी घसरलेली आहे… व्यवसायात आमची पोरं उद्योजक म्हणून पुढे येत असताना जाणवत नाही…पोटापाण्याची अजूनही व्यवस्थित सोय झालेली नाही… महिन्याला मिळणारे राशन आणि महिन्याला मिळणारा मोबाईलचा डेटा यात अडकून पडलेली पोरं विचार करायच्या मेंदूला हरवून बसलेली आहेत…ज्यांचं घर भरलेलं आहे त्यांनी समाजाला वाऱ्यावर सोडून दिलेल आहे… ही आजची भयानक परिस्थिती मला शांत बसू देत नाही..
ही सगळं करत असताना आपल्याच लोकांच्या शिव्या खायच्या… स्वतःला लई शहाणा समजतो का म्हणून त्यांची टीका सहन करायची… मन खचून गेलं तरीही हा चळवळ पेरण्याचा प्रवास मात्र करत राहायचं… कित्येक ठिकाणी ठरलेले मानधन मिळेलच याची खात्री नसते… कारण ते कार्यकर्ते नशेत असतात…त्यांना विसर पडतो. तरीही माझा हा प्रवास संपत नाही. कारण तळमळ एकच आहे. पुन्हा कुणी इथं विचारण्याचे धाडस करू नये…कोण नामदेव ढसाळ..?
एक सांगू तरीही ही चळवळ अगदी ताठ मानेने उभी आहेच.. का माहिती आहे का..? कारण स्वाभिमान सांभाळून ठेवणारे कार्यकर्ते या चळवळीत जिवंत आहेत.
म्हणून मी एक निर्णय घेतला आहे.. तो असा या सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीला पुन्हा जिवंत करण्यासाठी त्या वामनदादाच्या सुरपेटीला पुन्हा सूर देण्यासाठी आणि नामदेव ढसाळच्या कवितेला पुन्हा ताठ मानेने उभे करण्यासाठी, आणि खचून गेलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी …
मी स्वतः विद्रोही कवी नितीन चंदनशिवे येत्या १५ मे पासून आपण जिथे बोलावाल तिथे विना मानधन अगदी फुकट व्याख्यान आणि कविता सादरीकरानासाठी उपस्थित राहण्याची शपथ घेतली आहे.. अट फक्त एकच… किमान शंभर तरुण कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित राहावेत अशी व्यवस्था करावी ..
मी येतोय… तयारी करा… जयंती साजरी करण्यासाठी फक्त एप्रिल महिनाच असतो हा गैरसमज काढून टाका…मी या समाजाला आणि या चळवळीशी बांधिल आहे…
तयारी करा मला संपर्क करा… नियोजन करा…१५ मे पासून मी फुकट उपलब्ध होण्यासाठी तयार आहे…माझ्यासाठी मला राहायला लॉज नको…जेवायला भारी काही नको… न्यायला आणायला चारचाकी नको… जिथं रहा म्हणाल तिथं मी राहीन… मी वेळ पडलीच तर रस्त्यावर झोपून रात्र काढीन… आणि एखाद्या कार्यकर्त्याच्या घरातच चटणी भाकरी खाईन… आणि प्रवास म्हणाल तर मी एस. टी ने येईन… तेवढ तिकिटीचा खर्च देता आला तर द्या नाहीतर तो ही मी खिशातून घालीन…
मला मान पान सन्मान सत्कार काहीच नको… मला हवाय फक्त जिवंत माणूस…
खचून गेलेल्या या चळवळीतील स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी मी यायला तयार आहे… तुम्ही तयारी करा… मी माझ्या विद्रोही कविता आणि आंबेडकर पेरण्यासाठी यायला तयार आहे…
हे सांगण्याआधी मी इतकंच सांगेन मी कुठल्याही राजकीय पक्षाचा अथवा संघटनेचा सदस्य किंवा बांधिल नाही.. माझा प्रत्येक श्वास हा फक्त आंबेडकर आहे…मी आपल्या संपर्काची वाट पाहिन..
आपल्या सर्वांना स्वाभिमानी जय भिम…
त्यासाठी माझा संपर्क
विद्रोही कवी नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ.
7020909521

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!