अवैधआर्थिकगून्हानाशिकफसवणूकराजकीयविशेषशहरसामाजिक

भोंदू बाबांच्या सावलीत सत्तेची गुप्त मैफल? आयजींपासून मंत्र्यांपर्यंत धागेदोरे!

तृप्ती देसाईंचे आरोप, पंचतारांकित भेटींची चर्चा आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह.

प्रतिनिधी रेणुका गायकवाड नाशिक दि. २५ मार्च २०२६ राज्यात सध्या एक वेगळीच ‘आध्यात्मिक’ लाट उसळली आहे, भोंदू बाबांच्या आशीर्वादाने राजकारण, प्रशासन आणि सत्तेचे धागेदोरे एकमेकांत इतके गुंतले आहेत की, कोण कोणाला वाचवतंय आणि कोण कोणाला भेटतंय, याचा ताळमेळच बसत नाहीये!
एका बाजूला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पोलीस महानिरीक्षक (आयजी) दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप करत पोलिस यंत्रणेच्या भूमिकेवर थेट बोट ठेवले आहे. “गुन्हे दिसले नाहीत की दाखवले नाहीत?” असा सरळ सवाल करत त्यांनी प्रशासनाला कठघऱ्यात उभे केले.
महिलांच्या शोषणासारख्या गंभीर आरोपांवरही कारवाई का थंड आहे, याचं उत्तर मात्र अजूनही ‘तपास सुरू आहे’ या पारंपरिक वाक्यातच अडकलेलं दिसतंय.

दुसऱ्या बाजूला, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भोंदू बाबा अशोक खरात यांची पंचतारांकित हॉटेलमधील कथित भेट म्हणजे जणू या प्रकरणाचा ‘क्लायमॅक्स सीन’ ठरतोय. या भेटीत आयएएस अधिकारी राधाकृष्ण गमे (तत्कालीन नाशिक जिल्हाधिकारी), आयएएस राजेंद्र भोसले, तसेच आयपीएस अधिकारी बी. जी. शेखर (माजी आईजी नाशिक) उपस्थित असल्याची माहिती समोर आल्याने हा ‘साधा योगायोग’ आहे की ‘योजलेला प्रयोग’, यावर चर्चा रंगली आहे.

राजकीय वर्तुळात तर आता हा प्रश्न जोरात विचारला जातोय—
“बाबांच्या आशीर्वादासाठी भेट झाली की ‘व्यवहार’ ठरवण्यासाठी?”

अशोक खरात याचे विविध नेत्यांसोबतचे फोटो आधीच व्हायरल झालेले असताना, आता या गुप्त भेटींच्या चर्चेमुळे सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये कुजबुज वाढली आहे. माजी मुख्यमंत्री ते स्थानिक नेते—सगळ्यांच्याच नावांची सावली या प्रकरणावर पडताना दिसते.

दरम्यान, एसआयटी चौकशी सुरू असली तरी, जनतेच्या मनातला संशय मात्र अजून ‘क्लिअर’ झालेला नाही. उलट, प्रत्येक नवीन माहितीसमवेत प्रश्नांची संख्या वाढतेय—
“चौकशी खरी होणार की फाईल्समध्येच संपणार?”

एकूणच, भोंदू बाबांचे हे प्रकरण आता केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही. यात आयजी कराळे, आयएएस राधाकृष्ण गमे, आयएएस राजेंद्र भोसले आणि आयपीएस बी. जी. शेखर यांसारख्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आल्याने प्रकरण अधिकच संवेदनशील झाले आहे.

आता पाहायचे एवढेच..
ही कथा ‘सत्याचा विजय’ इथे संपते की पुन्हा एकदा ‘तपास सुरू आहे’ या परिचित शेवटाने?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!