ज्याला आपला ‘खरा इतिहास’ माहित असतो, त्याला कोणीही सहजपणे फसवू शकत नाही किंवा कोणाचे ‘गुलाम’ बनवू शकत नाही..

शिवरायांशिवाय रामदासांना कोण विचारतो?
प्रतिनिधी आकोला दि. २७ एप्रिल २०२६ साधारण दोन दिवसां पूर्वी म्हणजे २४ एप्रिल २०२६ ला नागपूर मधील एका कार्यक्रमात बागेश्वर बाबा ( धीरेंद्र गर्ग शात्री) नावाच्या भोंदूबाबाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. तो म्हणाला”शिवाजी महाराज लढाई करून थकले आणि त्यांनी मुकुट काढून रामदासाला म्हंटल की माझ्यावर कृपा करा, दया करा, आता माझ्याने युद्ध होत नाही, तुमच्याच आदेशाने हे राज्य चाललं आहे आता तुम्हीच हे राज्य चालवा. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत मंचावर उपस्थित होते पण त्यांनी हे विधान खोडून काढले नाही. त्यामुळे हे विधान नेमकं कुणाच्या मनातून निघाले याबाबत शंका येते. मागे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथील एका कार्यक्रमात “छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींमुळेच घडले” असे बिनबुडाचे धादांत खोटे वक्तव्य केले. त्या अगोदरसुद्धा औरंगाबाद येथे पार पडलेल्या समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे खोडसाळपनाचे वक्तव्य केले होते. राज्यपालांच्या वक्तव्याचे आश्चर्य यासाठी वाटत नाही कारण राज्यपाल जी टोपी घालतात त्या टोपीखालील मेंदू गहाण असतो हे जगजाहीर आहे. योगीजी सुद्धा त्याच संस्कारी परिवारातून येतात ज्यातून कोशियारी आले होते.
” आधी हा संस्कारी परिवार असा खडा टाकून पाहतो. जर उद्रेक ( विरोध ) झाला की काही दिवस शांत बसतात मग नविन नविन युक्त्या राबवतात व तोच खेळ पून्हा सुरू करतात.
असो आधी आपण थोडे रामदासांबद्दल जाणून घेऊ. रामदास हे १६ व्या शतकातील एक गोसावी होते. त्यांना संत, समर्थ, स्वामी ही विशेषणे आपण लावू शकत नाही कारण ते विषमतावादी होते. संत हे समतावादी असतात. संत हे जाती-धर्म-पंथाच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांच्या ठायी कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. पण रामदासांनी लिहून ठेवलंय.
“गुरु तो सकळांसी ब्राम्हण, जरी तो जाला क्रियाहीन
ब्राम्हण वेद मूर्तिमंत, ब्राम्हण तोचि भगवंत…
असो ब्राह्मणा सुरवर वंदिती, तेथे मानव बापुडे किती
जरी ब्राम्हण मूढमती तरी तो जगद्वंद्य…
अर्थात ब्राह्मणांपेक्षा कुणी श्रेष्ठ असूच शकत नाही. ब्राह्मणच भगवंत आहे. ब्राह्मणाला देवसुद्धा वंदन करतात. ब्राम्हण हा मूर्ख जरी असला तरी जगाने त्याला वंदन करावे. आता मला एक असा संत सांगा ज्याने एकाच जातीचे श्रेष्ठत्व सांगितले आणि मान्य केले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी कधी म्हंटलं की, कुणबीच सर्वात श्रेष्ठ असतात बाकी सगळे कनिष्ठ असतात म्हणून? संत रविदास महाराजांनी कधी म्हंटल की, चर्मकार हेच सर्वश्रेष्ठ असतात बाकी सगळे दुय्यम असतात म्हणून? संत सावता माळी, संत गोरोबा कुंभार यांनी कधी म्हंटले आहे का की, माळी जातीचे लोकच सर्वात श्रेष्ठ? कुंभार समाजाचे लोकच सर्वात उच्चवर्णीय असतात म्हणून? ह्या संतांनी समानता आणली. विश्वबंधुतेला मान्यता दिली. प्रत्येकाकडे फक्त माणूस म्हणून पाहिले म्हणून हे सगळे समतावादी खरे संत ठरतात तर ‘जरी ब्राम्हण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ’ असे म्हणणारे विषमतावादी रामदास हे संतच ठरत नाहीत. त्यामुळे समतावादी असणारे छत्रपती शिवराय अशा विषमतावादी व्यक्तीला गुरू मानणे तर दूर कधी साधे भेटले ही नसतील.
आता थोडे महाराजांन विषयी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला १९ फेब्रुवारी १६३० ला. शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ रोजी रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिवरायांनी अफजल खानाचा वध केला १० नोव्हेम्बर १६५९ मध्ये. शाहिस्तेखानाची बोटे कापली ५ एप्रिल १६६३ ला. पुरंदरचा तह झाला ११ जून १६६५ मध्ये. शिवरायांनी औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून सुटका करून घेतली १८ ऑगस्ट १६६६ ला. त्यानंतर त्यांनी तहात गमावलेले किल्ले पुन्हा स्वराज्यात आणले. आणि राज्याभिषेकाची तयारी सुरु केली. म्हणजे हे सर्व पराक्रम १६६६ च्या अगोदरच शिवरायांनी गाजवले होते, माँसाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनातच शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली होती. जिजाऊंनीच दोन्ही छत्रपती घडवले.
आता रामदास व शिवाजी महाराजांच्या भेटीविषयी बघुयात
खुद्द रामदासांच्या केशव गोसावी नावाच्या एका शिष्याने, दिवाकर गोसावी नावाच्या दुसऱ्या एका शिष्याला ४ एप्रिल १६७२ रोजी एक पत्र लिहिले आहे, त्याचा मजकूर असा की, “आपण पत्र पाठविले ते पावले. मजकूर समजला. राजेश्री शिवाजी राजे भोसले हे समर्थांचे भेटीस येणार म्हणोन लिहिले, ते समजले.. राजे यांची पहिलीच भेट आहे..” म्हणजे ४ एप्रिल १६७२ च्या अगोदर रामदासाची व शिवरायांची भेट झाली नव्हती. हा पुरावा रामदास संप्रदायातील अस्सल कागदपत्रात आहे. खुद्द रामदासांच्या शिष्यानेंच तो दिला आहे.
आता शिवाजी महाराजांचे गुरु म्हणविल्यानंतर बालपणापासून त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांना विविध युद्धकलांचे प्रशिक्षण देणे, त्यांना राजकारणाचे धडे देणे त्यासाठी वारंवार भेटी घेणे हे सर्व अपेक्षित आहे. परंतु १६७२ साली पहिली भेट होणार म्हणून पुरावा आहे. भेट झाली म्हणून पुरावा नाही. १६७२ पर्यंत छत्रपती शिवरायांनी पूर्णपणे स्वराज्याची स्थापना केली होती. आणि १६७४ साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाला रामदासांना शिवरायांनी बोलाविले नाही. रामदास सुद्धा स्वतः हजर राहिले नाही. हा राज्याभिषेक करण्यासाठी कुणीही ब्राम्हण तयार नसतांना रामदासानी का राज्याभिषेकाला ब्राम्हण पुरविले नाही? का स्वतःहून हजर राहून स्वतः राज्याभिषेक केला नाही? का राज्याभिषेकासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकही ब्राम्हण भेटला नाही? का हजारो किलोमीटर दुरून गागाभट्टाला पाचारण करावे लागले?
मिर्झा राजा जयसिंग, दिलेरखान म्हणजेच पर्यायाने औरंगजेब जिंकावा आणि शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा यासाठी ४०० ब्राह्मण कोटीचंडी यज्ञाच्या अनुष्ठानास बसले. त्यासाठी दिलेरखानाकडून मोठी रक्कम त्यांनी घेतली. मग ह्या ४०० ब्राम्हणांना रामदासांनी का अडविले नाही? का सांगितले नाही की, शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीत अडथळा निर्माण करू नका ?
छत्रपती शिवरायांच्या काळातील इतिहासाच्या अभ्यासाची विश्वसनीय व महत्वपूर्ण साधने-ग्रंथ म्हणजे परमानंदाचे शिवभारत, जेधे शकावली व राधामाधवविलासचंपू हे आहेत. आणि सर्वात विश्वसनीय बखर म्हणजे सभासदाची बखर ही आहे. हे सर्व ग्रंथ याकरिता विश्वसनीय समजले जातात कारण हे शिवाजी महाराजांच्या काळात लिहिले गेले आहेत. पण यापैकी एकही ग्रंथात रामदासाच्या नावाचा साधा उल्लेख देखील नाही. त्याचप्रमाणे रामदासकाळात किंवा त्यानंतर लगेच लिहिले गेलेले रामदासी संप्रदायाचे ग्रंथ जसे दिनकर स्वामीचा ‘स्वानुभाव दिनकर’, मेरुस्वामींचा ‘रामसोहळा’ यांमध्ये छत्रपती शिवरायांचा साधा उल्लेख देखील नाही. यावरून हे सिद्ध होते की हा गुरु शिष्य संबंध साफ खोटा आहे. मग हे संबंध जोडले कधी गेले? तर छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर १०० ते १२५ वर्षानंतर म्हणजेच पेशवे काळात लिहिलेल्या रामदासी बखर व त्याच काळात लिहिल्या गेलेल्या इतर मराठी बखरींमधून हा काल्पनिक संबंध जोडला गेला आहे. शिवरायांच्या काळात लिहिल्या गेलेल्या बखरी खऱ्या की त्यांच्या मृत्यूनंतर १२५ वर्षांनी लिहिल्या गेलेल्या खऱ्या? सभासदाची बखर ही १६ मार्च १६९४ ते १३ मार्च १६९७ दरम्यान राजाराम महाराजांच्याच काळात लिहून पूर्ण झालेली आहे. कृष्णाजी अनंत सभासदाने ही बखर राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार लिहिली आहे. रामदास आणि शिवरायांचे संबंध असते तर ते राजाराम महाराजांना नक्कीच माहिती असते आणि त्या संबंधांचा उल्लेख सभासद बखरीत आला असता. पण तसे झाले नाही.
रामदासांनी ३ एप्रिल १६७२ ला छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिले. त्यात शिवरायांच्या कार्याची स्तुती केली आहे. या पत्रात रामदास लिहितात.
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हाकारणे
म्हणजे महाराष्ट्र धर्म या पृथ्वीवर फक्त तुमच्यामुळे राहिला आहे हे रामदास स्वतः कबूल करतात. शिवरायांचे सामर्थ्य कबूल करतात. यातच ते पुढे लिहितात,
तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले
ऋणानुबंधे विस्मरण झाले, काय नेणू
म्हणजे तुमच्या राज्याच्या क्षेत्रात वास्तव्य केले परंतु तुम्ही आमची विचारपूस देखील केली नाही अशी तक्रार ते करतात. यावरून रामदासांची शिवरायांच्या लेखी काय किंमत होती हे सिद्ध होते. याच पत्रात ते शेवटी लिहितात.
उदंड राजकारण तटले, तेणे चित्त विभागले
प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे..
म्हणजेच खूप कामे बाकी असल्याने व द्विधा मनस्थितीत असून प्रसंग नसतांना हे पत्र लिहिल्याबद्दल रामदास छत्रपती शिवरायांची माफी मागतात. क्षमायाचना करतात. कोणता गुरु आपल्या शिष्याला पत्र लिहिल्याबद्दल क्षमा मागतो? यावरून रामदासांना छत्रपती शिवरायांचा किती आदरयुक्त दरारा होता हे लक्षात येते. छत्रपती शिवरायांनी कधीही आपल्या बोलण्यातून किंवा पत्रातून रामदास माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य असा उल्लेख केला नाही. रामदासांनी संपूर्ण आयुष्यात आपल्या वाङ्मयातून कधीच शिवाजी महाराज माझे शिष्य आहेत आणि मी त्यांचा गुरु आहे असा उल्लेख केला नाही. खुद्द शिवरायांना व रामदासांना हा संबंध माहीत नाही मग यांचे संबंध जबरदस्तीने जोडणारे कोण?
दासबोधात रामदास म्हणतात,
सांडूनियां श्रीपती, जो करी नरस्तुती
कां दृष्टी पडिल्यांची वर्णी कीर्ती, तो एक पढतमूर्ख
म्हणजे ईश्वराला सोडून एखाद्या माणसाची स्तुती करणारा हा मोठा मूर्ख असतो. मग रामदासांनी शिवरायांची इतकी स्तुती करणे याचा अर्थ काय समजावा? रामदास शिवरायांना ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ मानत होते हेच यावरून स्पष्ट होते.
रामदासांचे अभ्यासक श्री. भाटे म्हणतात की, “समर्थांचे दैवत शिवराय हे होते.” श्री.सदाशिव खंडो आळतेकर समर्थचरित्रात म्हणतात, “आयुष्याच्या अखेर समर्थ राजकारणावर उपदेश करू लागले, हे शिवाजीराजांच्या त्यांच्यावरील प्रभावाचेच द्योतक मानावं लागेल.”
विजापूर पातशाहीचे दोन मोठे अम्मलदार मुरार जगदेव व बाजी घोरपडे हे छत्रपती शिवरायांचे शत्रू. या शिवरायांच्या शत्रूंनीच रामदासांच्या नव्या देवस्थानांला काही स्वतः च्या जमिनी व काही जमिनी विजापूरच्या दरबारामार्फत इनाम दिल्या आहेत. रामदास जर शिवरायांचे गुरु असते तर शिवरायांच्या शत्रूंनी आणि आदिलशाहीने रामदासांना जमिनी दिल्या असत्या का? रामदासांनी त्या घेतल्या असत्या का? रामदास शिवरायांच्या शत्रूकडे आश्रीत म्हणून राहिले असते का? त्यांना मदत मागितली असती का? रामदासांनी रामाचे पहिले मंदिर आदिलशाहीत बांधले असते की शिवशाहीत? हासुद्धा विचार आपण करायला पाहिजे. मुधोळचे बाजी घोरपडे हे आदिलशाहाचे आश्रित आणि रामदास हे बाजी घोरपडेचे आश्रित. बाजी घोरपडेला शिवरायांनी कापून काढल्यानंतर मुधोळची जहागीर स्वराज्यात सामील झाली. त्यानंतर आता आपली जमीन-देवस्थान स्वराज्यात आले म्हणून रामदासाने शिवाजी महाराजांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. रामदास जर मुघलांविरोधात लढण्याकरिता आणि स्वराज्य स्थापनेकरिता प्रेरणा देऊ शकतात तर ज्या बाजी घोरपडेचे ते आश्रित होते त्या बाजी घोरपडेला त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा का दिली नाही? किंवा स्वतः स्वराज्य स्थापना का केली नाही?
रामदास हे रामाचे भक्त तर छत्रपती शिवराय हे हर हर महादेव म्हणणारे. रामदासांचे गंध उभे तर शिवरायांचे आडवे. शिवरायांचं राजमुद्रा असलेलं पहिलं पत्र १६४६ च आहे तर रामदासी पंथाची स्थापना १६४९ ची आहे. परस्त्री मातेसमान मानणारे छत्रपती शिवराय कुठे आणि मोठे इतिहास संशोधक प्रा. न. र. फाटकांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याच शिष्यीणींबरोबर अनैतिक संबंध ठेवणारे रामदास कुठे? ‘जरी ब्राम्हण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ’ असे म्हणणारे आणि मानणारे रामदास कुठे? आणि अफजलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीला ब्राम्हण आहे म्हणून मुलाहिजा न ठेवता त्याची गर्दन उडवणारे शिवराय कुठे?
एकाच जातीचे श्रेष्ठत्व सांगणारे विषमतावादी रामदास कुठे तर अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणारे समतावादी शिवराय कुठे? काहीच संबंध नाही. छत्रपतींचा असा जाहीर अपमान होत असतांना स्वयंघोषित शिवप्रेमी आपल्या पक्षाच्या आणि नेत्यांच्या दबावाखाली मूग गिळून गप्प बसतात हे अत्यंत संतापजनक आहे. अजून कितीवेळा छत्रपतींपेक्षा आपल्या नेत्यांना मोठे सिद्ध करणार आहात? एकतर वेळोवेळी सत्ते साठी शिवरायांचे नाव घेणे तरी बंद करा.
आजपर्यंत रामदासांना खोट्या प्रचारामुळे का होईना पण छत्रपती शिवरायांमुळे समाजात ओळख मिळाली. महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवरायांचा पराक्रम सांगतांना, मोठेपण सांगतांना कुठेही कधीच रामदासांचे नाव घ्यावे लागत नाही. परंतु रामदासांचा मोठेपणा सांगण्यासाठी प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घ्यावे लागते. शिवरायांच्या नावाचाच आधार घ्यावा लागतो. शेवटी शिवरायांशिवाय रामदासांना कोण विचारतो? -चंद्रकांत झटाले, अकोला



