अवैधआर्थिकगून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

जातीनिहाय जनगणने’च्या नावाखाली सायबर भामटे सक्रिय; पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचानागरिकांना सतर्कतेचा इशारा

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ०७ मे २०२६ सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर ‘जातीनिहाय जनगणना’ आणि ‘सरकारी सर्व्हे’च्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या वाढत्या प्रकारांची दखल घेत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी एक महत्त्वाची अ‍ॅडव्हायझरी (मार्गदर्शक सूचना) जारी केली असून, नागरिकांना कोणत्याही खोट्या लिंकवर क्लिक न करण्याचे आणि वैयक्तिक माहिती न देण्याचे आवाहन केले आहे.
अशी होतेय फसवणूक:
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, हे गुन्हेगार स्वतःला सरकारी अधिकारी किंवा एजंट असल्याचे भासवून नागरिकांना फोन, एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करत आहेत. “जातीनिहाय जनगणना सुरू आहे, तुमची माहिती अपडेट करा” असे सांगून किंवा “सरकारी लाभ/अनुदान मिळेल” असे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढले जात आहे. यासाठी “Caste Census”, “castecensusindia” अशा नावांचे बनावट फॉर्म्स आणि लिंक्स व्हायरल केल्या जात आहेत.
नागरिकांनी या लिंकवर क्लिक केल्यास, त्यांच्याकडून आधार क्रमांक, पॅन कार्ड, बँक खात्याची माहिती, एटीएम डिटेल्स, मोबाईल क्रमांक, OTP, आणि रेशन कार्डसारखी अत्यंत गोपनीय माहिती मागितली जाते. ही माहिती मिळताच क्षणात नागरिकांचे बँक खाते रिकामे केले जात आहे.

सायबर पोलिसांनी केलेले महत्त्वाचे आवाहन:
फक्त अधिकृत वेबसाईटचाच वापर करा: नोंदणी किंवा माहिती भरण्यासाठी फक्त अधिकृत शासकीय .gov.in डोमेनचाच वापर करावा.
बनावट लिंक्सपासून सावध: .com, .in, .org, Google Form किंवा WhatsApp लिंक किंवा इतर कोणत्याही अनधिकृत वेबसाईटवर माहिती अपलोड करू नये.
OTP आणि बँक डिटेल्स देऊ नका: अधिकृत जनगणना प्रक्रियेत सरकारी अधिकारी कधीही फोन किंवा व्हॉट्सॲपवरून OTP, पिन, पासवर्ड किंवा बँकेचा तपशील मागत नाहीत.
अनोळखी लिंक्स टाळा: कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद कॉल्स किंवा मेसेजेस त्वरित ब्लॉक करा.
फसवणूक झाल्यास काय करावे?
जर तुमची या किंवा इतर कोणत्याही प्रकारे सायबर फसवणूक झाली असेल, तर घाबरून न जाता त्वरित १९३० (1930) या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करावा. तसेच, ‘National Cyber Crime Reporting Portal’ वर आपली तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!