आंदोलनपिंपरी-चिंचवडपूणेमहाराष्ट्रशहरशैक्षणिकसामाजिक

NEET परीक्षा रद्द प्रकरणावर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आक्रमक निषेध..

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन..

प्रतिनिधी पुणे दि. १४ मे २०२६ NEET परीक्षा रद्द झाल्यानंतर देशभरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी संघटनेकडून पुणे शहरात आक्रमक निषेध आंदोलन करण्यात आले. “विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या व्यवस्थेविरोधात आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील प्रमुख उपस्थित होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि परीक्षा व्यवस्थापनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की,
“मागील काही वर्षांपासून NEET व इतर परीक्षांमध्ये पेपरफुटी, गैरव्यवहार आणि गोंधळाची मालिका सुरू आहे. लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतात, मात्र भ्रष्ट आणि निष्क्रिय यंत्रणेमुळे त्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे. मोदी सरकारला विद्यार्थ्यांच्या आणि जनतेच्या प्रश्नासंदर्भात काहीही देणे घेणे राहिलेले नाही. ते केवळ निवडणुकांचा प्रचार आणि आपले इव्हेंट करण्यात व्यस्त आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही.”
यावेळी श्रीकांत पाटील यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधत, “शिक्षण व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून, दोषींवर कठोर कारवाई आणि पारदर्शक परीक्षा प्रणाली लागू होईपर्यंत संघर्ष सुरू राहील,” असे सांगितले.
या आंदोलनात पिंपरी चिंचवड विद्यार्थी शहराध्यक्ष राहुल आहेर, प्रदेश सरचिटणीस शार्दुल उबाळे, प्रदेश सचिव राजवीर ठवरे, पुणे विद्यार्थी संघटनेचे अजय पवार, संघराज शेलार, युवक प्रदेश सचिव अशोक बेंद्रे, पुणे युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, युवक कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, अजय पवार, साहिल कांबळे, ओम पोकळे, जयदीप देवकुळे, रोहन पवार, अर्जुन गांजे, रिषभ भडाळे , स्वप्नील खंडागळे, आर्यन गायकवाड, ज्ञानेश्वर वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पदाधिकारी सहभागी झाले होते.
“NEET घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करा”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा”, “पेपरफुटी करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button