पिंपरी चिंचवड मनपा.पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

जनगणना प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

माहिती संकलन आणि नोंदींच्या अचूकतेसाठी दक्षता घेण्याचे दिले निर्देश..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २६ मे २०२६ जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आणि कालमर्यादित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. ही प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. जनगणनेदरम्यान माहिती संकलन, नोंदींची अचूकता आणि प्रशासकीय कामकाजामध्ये दक्षता बाळगावी. या कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे निर्देश आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या गृहसूची व गृहनिर्माण जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. 

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, मनोज सेठिया, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांच्यासह उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, राजेश आगळे, व्यंकटेश दुर्वास, कार्यकारी अभियंता महेश बरीदे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, राजाराम सरगर, अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, अतुल पाटील, पूजा दुधनाळे, मुकेश कोळप आदी उपस्थित होते.

जनगणनेसाठी माहिती संकलन करताना प्रत्येक नोंद अचूक राहील याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच प्रशासकीय बाबींमध्ये दक्षता आणि शिस्त राखण्यावर भर द्यावा. याशिवाय, जनगणना ही केवळ नियमित शासकीय प्रक्रिया नसून भविष्यातील विकास आराखडे, नागरी सुविधा आणि धोरणनिर्मितीसाठी आधारभूत माहिती उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी नमूद केले.

या बैठकीत उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी जनगणना प्रक्रियेमध्ये क्षेत्रीय पातळीवरील समन्वय, प्रगणकांना आवश्यक सहकार्य करून नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी माहिती संकलन करताना काटेकोरपणे नियमांचे पालन करावे, असे देखील नमूद केले.
कोट
जनगणना प्रक्रियेमध्ये अचूक माहिती संकलन आणि वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रगणक, पर्यवेक्षक आणि संबंधित विभागांनी समन्वय राखून नागरिकांशी प्रभावी संवाद साधत ही प्रक्रिया सुरळीत पूर्ण करावी. प्रत्येक नोंद विश्वसनीय आणि त्रुटीविरहित राहण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने देखरेख आणि मार्गदर्शन केले जात आहे.- सचिन पवार, उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!