अभिवादनअमरावतीधार्मिकमहाराष्ट्रविशेषशोध इतिहासाचा..सामाजिक

आंबेडकरी चळवळीचे आधारवड आणि लोकशाहीचे समर्थक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे

प्रतिनिधी अविनाश गोंडाणे अमरावती दि. २५ सप्टेंबर २०२६ बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्म २५ सप्टेंबर१९२५ रोजी चंद्रपूर येथे झाला.वडील देवाजी बापू खोब्रागडे आणि आई इंदिराबाई यांना पुत्र जन्माने अतीव आनंद झाला.तितकाच आनंद आजी पैकाबाई यांना देखील झाला आणि आजी पैकाबाई यांनी नातू राजाभाऊंच्या जन्माचे धूमधडाक्यात स्वागत केले. बाळ राजाभाऊ हे आजी पैकाबाई यांचे फार लाडके होते.
देवाजी बापू खोब्रागडे यांच्या आई पैकाबाई यांनी पती भिवाजी यांच्या निधनानंतर दुःख बाजूला सारून व्यवसायाकडे लक्ष दिले. आई पैकाबाई यांचे चिरंजीव देवाजी खोब्रागडे हे देखील व्यवसाय सांभाळू लागले. देवाजी खोब्रागडे यांच्या आई पैकाबाई ह्या व्यवसायात आणि व्यवहारात चोख होत्या. राजाभाऊ खोब्रागडे यांचे नाव भाऊराव होते, मात्र त्यांना प्रेमापोटी राजाभाऊ म्हणत होते. राजाभाऊ या नावानेच ओळखले जाऊ लागले. तो काळ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानव मुक्तीच्या लढ्याचा होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेला मानवमुक्तीचा लढा हा तथागतांच्या शांततेच्या मार्गानेच वाटचाल करणारा होता. खरेतर हा लढा समानतेचा लढा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला मानवमुक्तीचा लढा हा तथागतांच्या शांततेच्या मार्गाने वाटचाल करणारा होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीची आणि त्यांना ऐकण्याची ओढ देवाजी खोब्रागडे यांना लागली होती आणि ती ओढ १९२७ च्या दरम्यान पूर्ण झाली. १९४३ ला चंद्रपूरच्या रेल्वे स्टेशनवर देवाजी बापू यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जंगी स्वागत केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आणि मानव मुक्तीच्या लढ्याने देवाजी खोब्रागडे प्रेरित झाल्याने चळवळीत सक्रिय झाले. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे प्राथमिक शिक्षण हे चंद्रपूरच्या गव्हर्नमेंट ज्युबली हायस्कूल येथे झाले. पुढे इंटर सायन्स, सायन्स कॉलेज नागपूर, बी. ए.मॉरिस कॉलेज नागपूर येथे झाले. याच दरम्यान राजाभाऊ खोब्रागडे हे म. प्र. शेड्युल्ड कास्टस फेडरेशनचे सेक्रेटरी होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी ज्या १६ तरुणांना विलायतेला पाठविले होते त्यामध्ये राजाभाऊ खोब्रागडे यांचा देखील समावेश होता. बाबासाहेबांनी देवाजी बापू यांना म्हटल्यानुसार राजाभाऊंना विलायतेला स्वखर्चाने पाठविण्यात आले, कारण खोब्रागडे घराणे हे आर्थिकतेने सबळ होते. १९४९ ला राजाभाऊ खोब्रागडे हे बॅरिस्टर झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना राजाभाऊ खोब्रागडे यांच्याकडून फार अपेक्षा होत्या त्या अपेक्षेवर राजाभाऊ खोब्रागडे हे खरे उतरले १९५३ ला शेडूल्ड कास्ट फेडरेशन नागपूर प्रदेशचे ते अध्यक्ष झाले. पुढे १९५३ ते १९५६ च्या दरम्यान अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे ते सरचिटणीस होते. १९५७ ते १९७० पर्यंत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस होते. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी चळवळीला गती देण्याकरिता अपार कष्ट घेतले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवी कल्याणाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याचे काम बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी केले. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे आंबेडकरी विचारांचे आणि आंबेडकरी चळवळीच्या प्रामाणिकतेचे मूर्तिमंत उदाहरण होते. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याकरिता नागपूरची निवड केली होती. त्या धम्मदीक्षा समारंभाच्या यशस्वितेकरिता बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले. नागपूर येथील धम्मदीक्षा समारंभानंतर चंद्रपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झालेल्या धम्मदीक्षा समारंभाचे त्यांनी आयोजन केले होते. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत लोकशाहीचे तर कट्टर समर्थक होते. अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे ते अध्यक्ष होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध संस्थावर नियंत्रण करणाऱ्या अध्यक्षीय मंडळात त्यांचा समावेश होता. १९५८ ते १९८४ पर्यंत भारतीय संसद भवनाचे ते सदस्य होते. आंबेडकरी चळवळीला गती देण्याकरिता त्यांनी साप्ताहिक रिपब्लिकन टाईम सुरू केले. बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचे महत्व त्यांनी जाणले होते. अनेक पद त्यांनी उपभोगले असताना पदाचा गैरवापर त्यांनी कधी केला नाही. यातून आंबेडकरी विचारांची निष्ठा झळकते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आंतरराष्टीय बौद्ध संमेलनाला उपस्थित राहून प्रतिनिधित्व केले होते. रिपब्लिकन पक्ष व्यापक होण्याकरिता त्यांनी लोकांना जागृत केले होते. पुढे रिपब्लिकन पक्षाने गती पकडली होती. उत्तर नागपूर मतदार संघ हा एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला होता. दमयंती देशभ्रतार आणि सूर्यकांत डोंगरे यांनी उत्तर नागपूरचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. १९९५ ला स्मृतीशेष उपेंद्र शेंडे हे उत्तर नागपूरचे आमदार होते. रामरतन जाणोरकर यांना नागपूर महानगर पालिकेच्या महापौर पदी विराजमान केले होते. त्यांच्या जडण घडणीला वडील देवाजी बापू कारणी ठरले होते. आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीचा मार्ग देवाजी बापू यांच्यामुळेच कळला होता. नेतृत्व कळायला ती दृष्टी हवी, ती दृष्टी जर मिळाली तर राजकीय चळवळ ही पुन्हा गतिमान होऊ शकते. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे या आंबेडकरी चळवळीच्या आधारवडाची आणि लोकशाहीच्या समर्थकाची आज जयंती त्या निमित्त बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना विनम्र अभिवादन!

-प्रवीण कांबळे,अमरावती
संकलन – अविनाश गोंडाणे,अमरावती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button