पिंपरी-चिंचवडपूणेभेटीगाठीमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

नवीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून स्वागत; न्यायाधीश व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची बारची मागणी..

प्रतिनिधी पुणे दि. ०४ जून २०२६ पुणे जिल्ह्याचे नव्याने नियुक्त झालेले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. ए. टी. वानखेडे साहेब यांची पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा न्यायालयात सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

या प्रसंगी बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील न्यायालयीन व्यवस्थेसमोरील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीशांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः नव्याने सुरू झालेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) येथे न्यायालयीन कर्मचारी व न्यायाधीशांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने न्यायालयीन कामकाजावर ताण निर्माण होत असून प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी यासंदर्भात प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना निवेदन सादर करून पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा व न्यायालयीन कामकाजाचा विचार करून न्यायाधीशांची संख्या तातडीने वाढविण्याची तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

तसेच नेहरूनगर न्यायालय व मोरवाडी न्यायालय येथे वकील, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध पायाभूत सुविधा, प्रशासकीय अडचणी व दैनंदिन कामकाजातील समस्यांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर कायमस्वरूपी व प्रभावी तोडगा काढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी दिले.

यावेळी बार असोसिएशनच्या वतीने नेहरूनगर न्यायालय, मोरवाडी न्यायालय तसेच मोशी येथील प्रस्तावित न्याय संकुलाच्या इमारतीचा पाहणी दौरा करण्याची विनंती करण्यात आली. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी लवकरच पिंपरी-चिंचवड शहराला भेट देऊन संबंधित न्यायालयांची व प्रस्तावित न्यायसंकुलाच्या जागेची पाहणी करणार असल्याचे सांगितले.

बार आणि बेंच यांच्यातील समन्वय, परस्पर सहकार्य आणि सुसंवाद अधिक दृढ करण्यासाठी आपण कटिबद्ध असून वकिलांच्या हिताशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी बार असोसिएशनला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मतही प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी व्यक्त केले.

या भेटीप्रसंगी बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रीना मगदूम, माजी सचिव ॲड. धनंजय कोकणे, विद्यमान सदस्य ॲड. संकेत सरोदे, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. विकास शर्मा तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व नागरिकाभिमुख करण्यासाठी बार असोसिएशन सातत्याने पाठपुरावा करीत असून न्यायालयीन सुविधांच्या उन्नतीसाठी भविष्यातही प्रशासनाशी समन्वय साधून प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे मत बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!