
प्रतिनिधी धुळे, दि. ०७ जून २०२६ शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमधील कथित आर्थिक गैरव्यवहार व फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी तथा बँकेचे माजी व्यवस्थापक संजय कुलकर्णी यांना न्यायालयाने दिलासा न देता त्यांची पोलीस कोठडी ८ जून २०२६ पर्यंत वाढविण्याचा आदेश दिला आहे.
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा (EOW) करीत असून, बँकेतील कथित बोगस कर्जप्रकरणे, निधीचा अपहार, आर्थिक अनियमितता तसेच संबंधित व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणेने न्यायालयासमोर मांडलेल्या म्हणण्यानुसार, प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची साखळी उलगडणे, संबंधित कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करणे, लाभार्थी व्यक्तींची ओळख पटविणे तसेच या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासणे आवश्यक आहे.
प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देवढे, उपनिरीक्षक सविता गवांदे आणि पुलिस अंमलदार रवींद्र माळी, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गणेश खैरनार व विलास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. अटक करण्यात आलेले तत्कालीन व्यवस्थापक, संजय केशव कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांची आणि त्यांच्या सर्व ज्ञात व अज्ञात मालमत्तेची सखोल चौकशी झाली पाहिजे.अशी सभासदांनी मागणी केली आहे. बँकेतील अवैध विनातारणी बोगस कर्जप्रकरणे, आर्थिक गैरव्यवहार, कोट्यावधींच्या व्याज माफीने आर्थिक डबघाईला आलेल्या बँकेच्या इतर निधींचा अपहार, खोटा नफा दाखवणे, रिझर्व्ह बँकेला सुध्दा खोटी माहिती पुरवणे, आणि इतर संशयास्पद व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. तपास यंत्रणेने न्यायालयासमोर मांडलेल्या बाजूनुसार, प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणे, महत्त्वाचे दस्तऐवज व इलेक्ट्रॉनिक पुरावे हस्तगत करणे, लाभार्थी व्यक्तींची ओळख पटविणे तसेच इतर संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा तपास करणे आवश्यक आहे.
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री देवेंद्र तंवर आणि श्री पराग पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. तसेच ठेवीदार व भागधारकांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या बँक बचाव समितीने देखील प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावत तपासाला आवश्यक सहकार्य व कायदेशीर पाठपुरावा केला.
तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आरोपीची पुढील पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे तपास यंत्रणेने न्यायालयास सांगितले. त्यानंतर न्यायालयाने युक्तिवाद विचारात घेऊन संजय कुलकर्णी यांची पोलीस कोठडी ८ जून २०२६ पर्यंत वाढविण्याचा आदेश दिला.
या प्रकरणामुळे बँकेचे ठेवीदार, भागधारक आणि सहकार क्षेत्रातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, तपासातून आणखी महत्त्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



