कोल्हापूरच्या विद्यापीठाच्या नावात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख नको-सिध्दार्थ तलवारे

जय भारत माता सेवा समितीच्या सिध्दार्थ तलवारे यांची सरकार कडे मागणी..
प्रतिनिधी नांदेड दि. ११ जून २०२६ कोल्हापूरच्या विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ आहे या अशा नावामुळे महाराजांचा उल्लेख अपमानजनक वाटतो म्हणून या विद्यापीठाच्या नावातील शिवाजी या नावाच्या अगोदर छत्रपती व नावाच्या नंतर महाराज असा उल्लेख करून नामविस्तार करण्यात यावा अशी मागणी जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली (रजि)चे राष्ट्रीय सदस्य तथा जेष्ठ समाजसेवी सिद्धार्थ तलवारे यांनी राज्याचे महामहीम राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
तलवारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यासाठी १९६२ साली विद्यापीठाची स्थापना करण्यात आली व या विद्यापीठास शिवाजी असे एकेरी नाव देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण मराठी माणसांचे दैवत आहेत, त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख अपमानास्पद वाटतो. यापुर्वी युती सरकारच्या काळात व्हि.टी. रेल्वे स्टेशनचे नांव नामांतर करण्यात आले होते त्यावेळी देखील सुरवातीला खोडसाळपणा करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सर्वत्र आदराने घेतले जावे अशी समीतीची मागणी आहे, तेव्हा कोल्हापूरच्या विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर असा नामविस्तार करावा आणि तसा ठराव विधीमंडळात घ्यावा व या विद्यापीठास केंद्रीय विद्यापिठाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे, या आशयाचे निवेदन सर्व संबंधितांना देण्यात आले आहे असे सिद्धार्थ तलवारे यांनी कळविले आहे.



