आरोग्यगून्हामहाराष्ट्रशहरसामाजिक

गुटखा माफियांचा हैदोस! FDA च्या महिला अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न; जप्त ट्रक पळवून नेला, प्रशासनाला थेट आव्हान..

प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर दि. ११ जून २०२६ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याचा काळाबाजार किती बोकाळला आहे, याचे धक्कादायक उदाहरण सोमवारी (दि.९ जून) पहाटे वाळूज परिसरातील रहीमपूर येथे पाहायला मिळाले. गुटखा माफियांनी आता कायद्याची भीती पूर्णपणे झुगारून देत थेट शासकीय अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याचे धाडस दाखवले आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या पथकाने जप्त केलेला गुटख्याचा ट्रक गुंडांच्या मदतीने पळवून नेण्यात आला असून, महिला अधिकाऱ्याला स्कॉर्पिओखाली चिरडून ठार मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
ही घटना केवळ एका विभागावरील हल्ला नसून, राज्य शासन, कायदा आणि प्रशासनालाच दिलेले उघड आव्हान असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर धडक कारवाई
FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडक निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रहीमपूर परिसरात पहाटे सापळा रचला होता. संशयित आयशर ट्रक अडवून तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल २५ पोती प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला आढळून आला. पथकाने तत्काळ माल जप्त करून पुढील कारवाई सुरू केली.
मात्र, ही कारवाई गुटखा माफियांच्या जिव्हारी लागली आणि काही वेळातच घटनास्थळी नाट्यमय घडामोडी घडू लागल्या.
महिला अधिकाऱ्याला चिरडण्याचा थरारक प्रयत्न
पथक पोलीस संरक्षणाची वाट पाहत असतानाच विनाक्रमांक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ घटनास्थळी दाखल झाली. त्यातून उतरलेल्या ५ ते ६ जणांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. वातावरण तणावपूर्ण असतानाच गुंडांनी थेट महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना लक्ष्य केले.
भरधाव वेगाने स्कॉर्पिओ त्यांच्या अंगावर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रज्ञा सुरसे यांनी अत्यंत धाडस आणि प्रसंगावधान दाखवत बाजूला उडी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. काही सेकंदांचा उशीर झाला असता तर ही घटना जीवघेणी ठरली असती.
गोंधळात जप्त ट्रक पळवला
महिला अधिकाऱ्यावर हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत गुटखा माफियांनी जप्त केलेला ट्रक घटनास्थळावरून पळवून नेला. सरकारी कारवाईत अडथळा आणून जप्त मालासह वाहनच पळवून नेण्याची ही घटना प्रशासनासाठी अत्यंत गंभीर मानली जात आहे.
पोलीस यंत्रणा खडबडून जागी
घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धमकावणे आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, फरार आरोपी आणि पळवून नेलेल्या ट्रकचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
गुटखा माफियांना राजकीय आणि आर्थिक पाठबळ?
या घटनेनंतर एक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे. जर गुटखा माफिया शासकीय अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करून जप्त माल पळवून नेण्याचे धाडस करत असतील, तर त्यांच्या पाठीशी नेमके कोणाचे बळ आहे? सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे हे गुटखा रॅकेट इतके मजबूत कसे झाले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
“अधिकाऱ्यांवर हल्ला म्हणजे कायद्यावर हल्ला”
FDA च्या पथकावर झालेला हा हल्ला केवळ एका अधिकाऱ्यावर झालेला गुन्हा नसून, तो संपूर्ण प्रशासन आणि कायदा व्यवस्थेवर झालेला थेट हल्ला आहे. गुटखा माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर कारवाई करून मुख्य सूत्रधारांना तातडीने अटक करावी, अन्यथा अशा घटनांमुळे गुन्हेगारी टोळ्यांचे मनोबल आणखी वाढेल, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
रहीमपूर येथील ही घटना गुटखा माफियांची वाढती मुजोरी आणि कायद्याबद्दलची बेफिकिरी उघड करणारी ठरली असून, आता प्रशासन या आव्हानाला किती कठोर उत्तर देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!